गणेशोत्सवात आतापर्यंत २३३ हुल्लडबाजांवर कारवाई

देखावे पाहण्यासाठी आलेल्या महिला, तरुणींची छेडछाड तसेच हुल्लडबाजी करणाऱ्यांना पोलिसांनी हिसका दाखविला. शनिवारी (१० सप्टेंबर) मध्यभागात देखावे पाहण्यासाठी गर्दी उसळली असताना छेडछाड करणाऱ्या ९२ जणांना पोलिसांनी पकडून त्यांच्यावर कारवाई केली. गणेशोत्सवात आतापर्यंत २३३ हुल्लडबाजांवर पोलिसांनी कारवाई केली.

गणेशोत्सवात देखावे पाहण्यासाठी मध्यभागात शनिवारी भाविकांची गर्दी उसळली होती. परगावाहून मोठय़ा संख्येने भाविक उत्सवाच्या काळात मानाच्या मंडळांच्या श्रींच्या दर्शनासाठी गर्दी करतात. उत्सवाच्या काळात महिलांच्या छेड काढण्याच्या घटना घडतात. टवाळखोरांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी खास पथके तयार केली आहे. महिला पोलिसांचे दामिनी पथक, गुन्हे शाखेतील पोलिसांच्या पथकाने मध्यभागात गस्त घालण्यास सुरुवात केली आहे. शनिवार आणि रविवारी जोडून सुट्टय़ा आल्याने मध्यभागात मोठी गर्दी झाली होती.

या संदर्भात गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पी.आर.पाटील म्हणाले, की गौरी विसर्जन आणि लागोपाठ जोडून आलेल्या सुट्टय़ांमुळे देखावे पाहण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे पोलिसांनी शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील महत्त्वाच्या मंडळाच्या परिसरात बंदोबस्त तैनात केला आहे. गर्दीत महिलांची छेड काढणे तसेच हुल्लडबाजी करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई सुरू केली. छेड काढताना पकडला गेल्यास पोलिसांकडून खटला दाखल करण्यात येतो. आतापर्यंत उत्सवाच्या कालावधीत २३३ हुल्लडबाजांवर कारवाई करण्यात आली. तर शनिवारी रात्री ९२ हुल्लडबाजांना पोलिसांनी पकडून त्यांच्यावर कारवाई केली.

महिलांना सुरक्षित वातावरणात देखावे पाहता यावेत म्हणून पोलिसांनी प्रत्येक ठिकाणी बंदोबस्त तैनात केला आहे, असे पाटील यांनी नमूद केले.