सध्या देशातील राजकारण आणि आंदोलने यांना पूर्णपणे व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाले आहे. भाडोत्री लोकांना हाताशी धरून निवडणुका लढविल्या जात आहेत, अशी खंत राष्ट्र सेवा दलाचे कार्यकारी विश्वस्त डॉ. अभिजित वैद्य यांनी रविवारी व्यक्त केली. अशा कठीण कालखंडामध्ये समाजवादी चळवळीने आत्मपरीक्षण करून लोकशाही समाजवादाच्या स्थापनेसाठी कटिबद्ध व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
ज्येष्ठ नेते एस. एम. जोशी यांच्या २५ व्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून राष्ट्र सेवा दलाच्या पत्रिका विशेषांकाचे प्रकाशन ज्येष्ठ नेते भाई वैद्य यांच्या हस्ते झाले. राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. अरिवद कपोले, जिल्हाध्यक्ष दत्ता पाकिरे, अॅड. संतोष मस्के, माधव गुरव, सुरेश देशमुख, विठ्ठल सातव, बी. आर. माडगूळकर, राजन दांडेकर उपस्थित होते.
डॉ. वैद्य म्हणाले, हिंदूुत्ववादी मंडळी युवकांना धर्माच्या माध्यमातून अफूची गोळी देत आहेत. बजरंग दल, विश्व हिंदूू परिषद, वनवासी कल्याण आश्रम अशा विविध मार्गानी विळखा घातला असून व्यवस्था पोखरण्याचे काम होत आहे. याला प्रतिबंध केला गेला नाही, तर देशामध्ये हिंदूू तालिबानी निर्माण होतील.
व्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करणारी राजकीय संघटना म्हणून राष्ट्र सेवा दलाने काम करावे अशीच एसेम यांची अपेक्षा होती, असे सांगून भाई वैद्य म्हणाले, मंदीचे वातावरण असताना भांडवलवाद पराभूत होत आहे. साम्यवादाची पिछाडी होत असताना देशामध्ये लोकशाही समाजवाद गरजेचा आहे. नक्षलवादाकडे वळणाऱ्या तरुणाईला रोखण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत. धार्मिक स्वातंत्र्याचा वापर चुकीच्या पद्धतीने विखार करण्यासाठी होत असेल, तर त्याला विरोध हा केलाच पाहिजे.