पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. या मागणीसाठी राज्यभरात आज भाजपकडून आंदोलन केले जात आहे.आज पुणे भाजप महिला मोर्चामार्फत आशिष गार्डन ते कोथरूड पोलीस स्टेशन पर्यंत मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलनकर्त्यां महिलांनी कोथरूड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेघशाम डांगे यांना निवेदन दिले. तसेच आंदोलनारम्यान राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.

नक्की वाचा >> पूजा चव्हाण प्रकरण : ‘शरद पवार, जागे व्हा’ अशा घोषणा देत…

पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येला १९ दिवसांचा कालावधी होऊन गेला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्याच पक्षाचे नेते आणि मंत्री संजय राठोड यांच्यावर कारवाई करीत नाही. ही बाब निषेधार्थ असून जोवर कारवाई केली जात नाही. तोपर्यंत आम्ही आवाज उठवत राहणार असल्याची भूमिका आंदोलनकर्त्यां महिलांनी यावेळी मांडली.


कळंबोलीत मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग रोखण्याचा प्रयत्न…

पनवेल माहनगरपालिकेच्या महापौर कविता चौतमोल यांच्या नेतृत्वाखाली आज कळंबोलीमध्येही भाजपाच्या महिलांनी आंदोलन केलं.  या आंदोलनामध्ये कळंबोली येथे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पोलिसांनी वेळीच धाव घेत आंदोलकांना ताब्यात घेतलं. महापौर कविता चौतमोल यांच्यासह सभापती मोनिका महानवर आणि इतर नगरसेविकांसहीत भाजपाच्या अनेक महिला कार्यकर्त्यांनी आज कळंबोली येथे पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी संजय राठोड यांच्यावर राज्य सरकारने कारवाई करावी अशी मागणी करत आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी, ‘शरद पवार, जागे व्हा’ अशा घोषणा देत मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक अडवण्याचा प्रयत्न केला. कळंबोली येथील मॅकडोनाल्ड हाॅटेलसमोरील महामार्ग रोखण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला.  कळंबोली पोलिसांनी वेळीच धाव घेऊन महापौर चौतमोल यांच्यासह महिला व पुरुष अशा ३५ आंदोलकांना ताब्यात घेतले.