देशभरात मागील काही दिवसात करोना विषाणूंचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. अशीच परिस्थिती आपल्या राज्यात देखील असून त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभा, आंदोलन आणि बाहेर गर्दी करू नये, असे आवाहन केले आहे. मात्र आज पुण्यात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संजय राठोडवर गुन्हा दाखल करण्यात यावा. या मागणीसाठी वानवडी पोलिस स्टेशन बाहेर भाजप युवा मोर्चाचे पुणे शहर अध्यक्ष राघवेंद्र मानकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

मात्र या आंदोलन दरम्यान कार्यकर्त्यांनी मास्क घातले नव्हते. तर सोशल डिस्टंन्सिंगचे पालन केले नाही. यामुळे भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला एक प्रकारे केराची टोपली दाखविण्याचे काम केले आहे.

पूजा चव्हाण या तरुणीने आत्महत्या करून 18 दिवस होत आले आहेत. या प्रकरणी शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला जावा. अशी मागणी भाजपकडून सतत होत आहे. तर त्याच दरम्यान आज भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर वानवडी पोलिस स्टेशन आणि पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेऊन संजय राठोड यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी. अशी मागणी केली.

मात्र पोलिस आयुक्तांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने, चित्रा वाघ यांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर काही वेळात भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी वानवडी पोलिस स्टेशन बाहेर संजय राठोडवर कारवाई झाली पाहिजे. या मागणीसाठी आंदोलन केले. तसेच सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.

यावेळी राघवेंद्र मानकर म्हणाले की, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संजय राठोड यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. जोवर कारवाई होत नाही. तोपर्यंत आम्ही आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता. सभा किंवा आंदोलन करू असे आवाहन सरकार मार्फत करण्यात आले आहे. त्यावर ते म्हणाले की, आम्ही नियमांचे उल्लंघन केले असेल तर आम्हाला चालेल, पण आम्हाला काही करून त्या युवतीला न्याय द्यायचा असल्याची भूमिका त्यावर त्यांनी मांडली.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी भाजप युवा मोर्चाकडून तक्रार अर्ज

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संजय राठोडवर गुन्हा दाखल करण्यात यावा. या मागणीचा तक्रार अर्ज भाजप युवा मोर्चाचे पुणे शहर उपाध्यक्ष स्वरदा बापट यांनी वानवडी पोलीस स्टेशनचे एस. साळगावकर यांच्याकडे दिला.