समाजमाध्यमांच्या गैरवापरावरून नेहमी टीका होते, मात्र त्याचा सुयोग्य वापर केल्याने घडून आलेल्या सकारात्मक गोष्टींविषयी माहिती देणारं हे नवीन सदर.

‘मज आवडते ही मनापासुनी शाळा’ ही आपल्यापैकी अनेकांची शाळेबद्दलची भावना असते. तुमच्या आयुष्यातला सगळय़ात संस्मरणीय काळ कोणता असं विचारलं तर – ‘शाळेतला’ हे उत्तर ठरलेलं. शाळा मागे पडली की विखुरलेले मित्र-मैत्रिणी पुन्हा भेटणे दुरापास्त हे एकेकाळचं चित्र आता बदलतंय. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपमुळे जुन्या मित्र-मैत्रिणींना शोधून त्यांच्याशी पुन्हा जोडलं जाणं सोपं झालंय. फेसबुकवर एकत्र आलेल्या मित्रमंडळींचे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्स होतात, पुढे शाळेच्या आठवणीनं ‘नॉस्टॅल्जिक’ होत ‘गेट टुगेदर्स’ही केली जातात. त्यानिमित्ताने शाळेत जाणं आणि शाळेच्या दिवसांतल्या आठवणींना उजाळा देणं ही कधी कल्पनेतही नसलेली किमया याच ‘सोशल मीडिया’मुळे अनेकांच्या बाबतीत साधलीय. मात्र भेटीगाठी आणि जुन्या आठवणी जागवण्यापलीकडे आपल्या लाडक्या शाळेला बदलत्या काळाबरोबर आधुनिक रूप देण्याचा संकल्प बुलडाणा जिल्हय़ातल्या काही माजी विद्यार्थ्यांनी केला आणि तो तडीसही नेला.

बुलडाण्याच्या लोणार तालुक्यातील पिंप्री खंडारे गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी हे काम केलंय. या शाळेतून प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेले माजी विद्यार्थी फेसबुकमुळे जोडले गेले. पुढे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरून गप्पा मारताना शाळेची सध्याची परिस्थिती फार बरी नसल्याचं लक्षात आलं. त्यातूनच आपल्याला उत्तम माणूस म्हणून घडवणाऱ्या शाळेला मुख्य प्रवाहात आणायचा ध्यास या मित्रमंडळींनी घेतला. राजू केंद्रे, शिवहरी ढाकणे, बबन गवई, गजानन वाघ, भूषण पवार, भास्कर उबाळे, बंडू उबाळे अशा माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन ‘विद्यार्थी विकास बचत गट’ सुरू केला. ५० माजी विद्यार्थी, गावातील प्रतिष्ठित लोक एकत्र करून शाळेचा कायापालट करायचा आपला निश्चय बोलून दाखवून ते थांबले नाहीत. शाळेप्रति आपली जबाबदारी म्हणून प्रत्येकानं दोन हजार रुपये वर्गणी काढली. त्यांना सहकार्य म्हणून ग्रामस्थांनीही महिन्याला शंभर रुपयांचा आपला वाटा उचलला.

राजू केंद्रे हा याच शाळेचा माजी विद्यार्थी सध्या यवतमाळ इथे मुख्यमंत्री ग्रामीण विकास कार्यक्रमाच्या पाठय़वृत्तीवर काम करतो. शाळेच्या कायापालटाच्या कल्पनेत त्याचा सहभाग मोठा आहे. राजू सांगतो, मी विद्यार्थी होतो तेव्हा शाळेची पटसंख्या २००पेक्षा जास्त होती. आता आजूबाजूला अनेक कॉन्व्हेन्ट शाळांचं पेव फुटलंय. माझ्या शाळेची पटसंख्या जेमतेम ९०च्या घरात आली. शिक्षण कसं का मिळेना, आपली मुलं झकपक शाळेत शिकावीत हे कोणत्याही पालकाला वाटतं. माझ्या शाळेची शेवटची रंगरंगोटी २००३ मध्ये झाली. रंग उडालेल्या भिंती, उखडलेली जमीन.. मुलं येणार कशी आणि रमणार कशी? राजू विचारतो. म्हणून शाळेचं रंगरूप बदलण्यापासूनच सुरुवात करायची ठरवली. विशेष म्हणजे शिक्षकांनीही आम्हाला भरपूर सहकार्य केलं. शाळेच्या भिंतींना फ्रेश रंग आले. त्यांवर लहान मुलांना आवडतील अशी चित्रं सजली. आज मुलांना ‘शाळेतून घरी जाऊ नयेसं वाटेल’ असा बदल शाळेत झालाय. शाळेतले सगळे वर्ग आम्ही एक एक करत ‘डिजिटल’ केले. संगणक, प्रोजेक्टर, इंटरनेटवरचा माहितीचा खजिना यासाठी आता मुलांना शहरात जायची वाट पाहायला नको हाच यामागचा उद्देश आहे, हेही राजू आवर्जून नमूद करतो. याच धरतीवर गावातील अंगणवाडय़ांचा कायापालटही करण्यात आलाय. हा सकारात्मक बदल सध्या ग्रामस्थ, विद्यार्थी आणि पालक सगळय़ांनाच सुखावतोय आणि त्यातून इंग्रजी माध्यमाकडे कल असलेले पालक आपल्या मुलांना मराठी माध्यमात घालायचं म्हणताहेत!

पिंप्री खंडारे गावात एक वाचनालय आहे. सध्या बरेच दिवस ते बंदच असतं. पण शाळेपाठोपाठ आता वाचनालय पुनरुज्जीवित करायचा विद्यार्थी विकास बचत गटाचा कार्यक्रम आहे. सोशल मीडिया म्हणजे वेळ घालवायची जागा, त्यातून कधीच काही चांगलं साधत नाही, असा समज असलेल्या प्रत्येकासाठी हे उदाहरण दिलासादायक आहे!

भक्ती बिसुरे – bhakti.bisure@expressindia.com