कार्यालयांमध्ये टपालाचे ढीग; निपटाऱ्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी

पुणे : करोना संकटामुळे गेल्या अडीच महिन्यांपासून शहरातील टपाल वितरण यंत्रणा कोलमडली आहे. विविध टपाल कार्यालयांमध्ये बटवडय़ाचा ढीग जमा झाला असून त्याचा निपटारा करण्यासाठी किमान तीन महिन्यांचा कालावधी लागेल, अशी परिस्थिती आहे.

सुरक्षित अंतर ठेवण्याच्या दृष्टिकोनातून शासनाने प्रारंभी ३३ टक्के कर्मचाऱ्यांमध्ये काम सुरू ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळाच्या साहाय्याने काम सुरू ठेवण्यामध्ये अडचणी आल्या. त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला. केवळ तीन टक्के भाग प्रतिबंधित क्षेत्रामध्ये असताना शहरातील अनेक नागरिकांना अडीच महिन्यांमध्ये एकही पत्र आले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आता कर्मचारी उपस्थितीचे प्रमाण ५० टक्के करण्यासाठी शासनाने मुभा दिली आहे.

आधीच पोस्टमनची संख्या कमी असून सुरक्षित अंतर ठेवण्याच्या उद्देशातून ५० टक्के कर्मचाऱ्यांमध्ये काम करावे लागत आहे. मात्र, वैद्यकीय साधने असलेल्या अत्यावश्यक टपालांसह महत्त्वाच्या टपालांचे वितरण करण्यात येत आहे, असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.

टपाल वितरणासाठी गेलेल्या पोस्टमनला सोसायटीमध्ये प्रवेश नाकारण्यात आल्याचा फटका बसला हे वास्तव असले, तरी उपलब्ध मनुष्यबळामध्ये कर्मचाऱ्यांनी उत्तम सेवा दिली असल्याचाही दावा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. शहराच्या मध्यवर्ती असलेले सिटी पोस्ट प्रतिबंधित क्षेत्रामध्ये येत असल्याने काम करण्यावर मर्यादा आल्या. मात्र, प्रतिबंधित नसलेल्या भागात कर्मचाऱ्यांनी चांगली सेवा दिली, असे वरिष्ठ पोस्टमास्तर स्वाती दळवी यांनी सांगितले. या कार्यालयामध्ये ३० पोस्टमन आहेत. मात्र, ३३ टक्के उपस्थितीच्या शासनाच्या आदेशानुसार दररोज दहा जणांना कामावर बोलावले जात होते. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये घरपोच टपाल सेवा देता आली नाही. मात्र, या भागातील बँकांची आणि एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची पत्रे तसेच वैद्यकीय साधने असलेल्या टपालांचे वितरण करण्यात आले. ज्या टपालावर संबंधितांचा दूरध्वनी क्रमांक होता त्यांच्याशी संपर्क साधून हे टपाल वितरित करण्यात आले, असे त्यांनी सांगितले.

लोकमान्यनगर येथील पश्चिम विभाग प्रवर अधीक्षक कार्यालयाच्या अखत्यारित २४ टपाल कार्यालयांचा समावेश आहे. या सर्व कार्यालयांसाठी ४४८ पोस्टमनची पदे मंजूर आहेत. मात्र, सध्या २११ पोस्टमन कार्यरत आहेत. शासनाच्या आदेशानुसार दररोज ३३ टक्के कर्मचारी कामावर येत होते. आता ही संख्या ५० टक्क्य़ांवर गेल्यामुळे काहीसा दिलासा मिळाला असल्याची माहिती सहायक अधीक्षक चंद्रकांत भोर यांनी दिली.

लाभांशाचे धनादेश अडकले

समभागामध्ये गुंतवणूक करणाऱ्या ना त्यावरील परतावा लाभांशाच्या स्वरूपात दिला जातो. मार्चअखेरीस वर्ष संपल्यानंतर जाहीर झालेल्या लाभांशाच्या रकमेचा धनादेश टपाल विभागामार्फत पाठविले जातात. विभागाच्या बटवडय़ामध्ये अडकून पडले आहेत. तीन महिन्यांनंतर धनादेशाची मुदत संपत असल्यामुळे टपाल मिळाल्यानंतर बँकेत जमा करता येणार नाही, याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.

टाळेबंदीच्या काळात पोस्टमनची संख्या कमी असताना नागरिकांना अत्यावश्यक सेवा देण्यात आल्या आहेत. साध्या टपाल पत्राचे वितरण काही प्रमाणात राहिले आहे. सरकारने नियमामध्ये शिथिलता आणली आहे. मनुष्यबळ वाढल्यानंतर काही दिवसांमध्ये टपालाचा निपटारा केला जाईल.

क्षितिजा कुलकर्णी, पोस्टमास्तर, उप डाकघर, आकुर्डी

पिंपरीतही टपाल साचलेलेच

पिंपरी : पिंपरी शहरातील टपाल कार्यालयांमध्ये टपालाचा ढीग साचला आहे. पोस्टमनची संख्या कमी असताना अत्यावश्यक टपाल पत्र, पार्सल, रजिस्टर पत्र, स्पीड पत्राचे वितरण केल्याचा दावा  अधिकाऱ्यांनी केला आहे.

सरकारी कार्यालयामध्ये मनुष्यबळाची मर्यादा ठरवून दिली. टपाल कार्यालयामध्ये पोस्टमनची संख्या मोजकीच राहिली. त्यामुळे टपालाचे वितरण बंद होते. फक्त अत्यावश्यक टपालाचे वितरण करण्यात आल्याचे टपाल कार्यालयाकडून सांगण्यात आले. यामध्ये रजिस्टर्ड टपाल, स्पीड पोस्ट, पार्सल, औषधांचे पार्सल , मनी ऑर्डर, डोअर स्टेप बँकिग, निवृत्तिवेतन या सेवा नागरिकांना देण्यात आल्या. प्रतिबंधित क्षेत्रात जाता आले नाही, तर नागरिकांना दूरध्वनी करून बोलावून घेतले जात होते. काही वेळा अत्यावश्यक टपाल इमारतीच्या सुरक्षारक्षकांकडे देऊन त्याची पोच घेतली जात होती. पोस्टमनची संख्या कमी असल्यामुळे साध्या टपालाचे वितरण केले गेले नाही.  मासिके, टपाल पत्रांचा ढीग साचल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेक इमारतींमध्ये पोस्टमनला मज्जाव करण्यात आल्यामुळे टपाल वितरण करण्यात आले नाही.