News Flash

चाकणमध्ये एकाच ठिकाणी ६७ सदनिकांत वीजचोरी

स्वप्ननगरी कॉम्प्लेक्समधील पाच इमारतींमधील ६७ सदनिकांमधील विजेची स्थिती पाहून पथकातील सर्वाच्याच भुवया उंचावल्या

| November 21, 2015 03:22 am

शहरात झोपडपट्टय़ांमध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये विजेच्या तारांवर आकडे टाकून वीज घेण्याचे प्रकार अनेकदा घडले आहेत. त्याचप्रमाणे वीजमीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी करण्याचे प्रकारही अनेकदा उघडकीस येत असतात. मात्र, चाकण परिसरात चक्क सदनिकाधारकांकडूनही वीजचोरी झाल्याचा प्रकार तपासणीत उघड झाला. कोणताही अधिकृत वीजजोड व मीटरही नसताना ही मंडळी वीज वापरत असल्याचे या प्रकरणात स्पष्ट झाल्याने महावितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारीही चक्रावून गेले.
वीजचोरांविरुद्ध महावितरणकडून सुरू असलेल्या मोहिमेमध्ये मागील काही दिवसांपासून मोठमोठय़ा वीजचोरांना पकडण्यात आले आहे. याच मोहिमेमध्ये महावितरणच्या वीसजणांच्या पथकाने चाकण येथील स्वप्ननगरी कॉम्प्लेक्समधील इमारतींची कसून तपासणी केली. त्यातील पाच इमारतींमधील ६७ सदनिकांमधील विजेची स्थिती पाहून पथकातील सर्वाच्याच भुवया उंचावल्या. या सदनिकांमध्ये कोणताही अधिकृत वीजपुरवठा देण्यात आला नव्हता. विजेचे मीटरही नव्हते, पण सदनिकांमध्ये वीजपुरवठा सुरू होता.
सदनिकांमध्ये ही वीज नेमकी आली कुठून याचा शोध घेण्यात आला. इमारतींना वीजपुरवठा देण्यासाठी इमारतींजवळ बसबार ही यंत्रणा उभारलेली असते. या सदनिकाधारकांनी थेट याच यंत्रणेतून वीज घेतली होती.  दहा तासांच्या प्रयत्नानंतर वीजचोरीचा हा प्रकार लक्षात आला. इतर दोन इमारतींमध्ये सार्वजनिक वापराच्या जागेतील विजेसाठीही अशाच पद्धतीने वीजचोरी करण्यात आली होती. या ठिकाणी ७० हजार ३४७ युनिट विजेची चोरी झाल्याचे उघड झाले. त्यामुळे या सर्व वीजचोरांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात आली. पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता रामराव मुंडे यांच्या नेतृत्वाखाली पुणे ग्रामीण मंडलचे अधीक्षक अभियंता सुनील पावडे, कार्यकारी अभियंता मनीष ठाकरे, उपकार्यकारी अभियंता रामचंद्र चव्हाण, सहायक अभियंता मंगेश सोनवणे, विक्रम राठोड, जनमित्र विलास सातकर, नारायण जाधव, संपत शिंदे आदी या मोहिमेत सहभागी झाले होते.
महावितरणने यापूर्वी केलेल्या कारवाईमध्ये मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी, रिमोट कंट्रोलचा वापर करून मीटरमधील वीज वापराची नोंद थांबवून वीजचोरीचे अनेक प्रकार उघडकीस आले. सोसायटय़ांमध्येही वीजचोरीचे प्रकार उजेडात आले, पण या सर्व ठिकाणी अधिकृत वीजजोड व मीटर होता. मीटरही नसताना थेट यंत्रणेतून सोसायटय़ांमध्ये वीजचोरी करण्याचा हा प्रकार प्रथमच उजेडात आला असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 21, 2015 3:22 am

Web Title: power meter electricity theft society
टॅग : Electricity,Society,Theft
Next Stories
1 अपेक्षित अध्यक्षाची निवड न झाल्याने आठवला दुष्काळ
2 नोकरी मिळवून देण्याच्या आमिषाने लैंगिक शोषण
3 घोरपडी व लुल्लानगर उड्डाणपुलाचा प्रश्न मार्गी
Just Now!
X