‘निवडणुका जाहीर होतात तेव्हा सुरुवातीच्या काळात मित्र पक्षांमध्ये अस्थिरता निर्माण होते, पण दोन-तीन दिवसात सारे सुरळीत होईल. तरीही लोकशाहीत प्रत्येक पक्षाला आपल्या निर्णयाचे स्वातंत्र्य आहे. किती समजूतदारपणा दाखवायचा हे त्या-त्या पक्षाने ठरवायचे आहे,’ असे मत केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले. एका सार्वजनिक कार्यक्रमाच्या निमित्ताने जावडेकर रविवारी पुण्यात आले होते. जागावाटपाच्या मुद्दय़ावरून महायुतीतील मित्र पक्ष वेगळा मार्ग स्वीकारण्याच्या तयारीत आहेत का, या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल ते बोलत होते.  
जावडेकर म्हणाले, ‘‘निवडणुकीचे पडघम वाजू लागल्यानंतर वेगवेगळे पक्ष आपल्या भूमिका आपापल्या शैलीत मांडतात. परंतु लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात आम्हाला जे अद्भुत जनसमर्थन मिळाले ते मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रीय स्वाभिमान पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष यांच्या महायुतीला मिळाले आहे. त्याची कदर सर्व पक्षांना आहे. तरीही लोकशाहीत प्रत्येक पक्षाला आपल्या निर्णयाचे स्वातंत्र्य आहे. किती समजूतदारपणा दाखवायचा हे त्या-त्या पक्षाने ठरवायचे आहे.’’
घोटाळ्यांसाठी काँग्रेसच्या मंत्र्यांबरोबरच मनमोहन सिंग देखील जबाबदार
माजी केंद्रीय महालेखापाल विनोद राय यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर केलेल्या टीकेच्या संदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर जावडेकर म्हणाले, ‘‘टू- जी स्पेक्ट्रम घोटाळा, एअर इंडिया घोटाळा, कोळसा घोटाळा या सर्व घोटाळ्यांबाबत मंत्री जबाबदार आहेतच, पण पंतप्रधान मनमोहन सिंग यांनाही आपल्या जबाबदारीपासून पळ काढता येणार नाही. त्यांच्या डोळ्यांसमोर घोटाळे होत राहिले पण ते संबंधितांना थांबवू शकले नाहीत. ज्यांनी त्यांना पद दिले पण सत्ता दिली नाही असे ‘१० जनपथ’ देखील या घोटाळ्यांसाठी तेवढेच जबाबदार आहे. याचेच उत्तर भारतीय जनता पक्ष मागत आहे.’’