सांगली जिल्ह्य़ामधील बत्तीस शिराळा येथे जिवंत नागाची पूजा करण्यास उच्च न्यायालयाने बंदी घातली असल्याने तेथील अनेक वर्षांची परंपरा खंडित झाली झाली आहे. ही पूजा पुन्हा सुरू होऊन नागपंचमी साजरी करता येण्यासाठी कायद्यामध्ये बदल करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नागपंचमीच्या दिवशी बत्तीस शिराळा येथे जिवंत नागांना पकडून त्यांची पूजा केली जात होती. त्याचप्रमाणे त्यांच्या स्पर्धाही घेण्यात येत होत्या. या प्रकाराच्या विरोधात निसर्गप्रेमींनी न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर निर्णय देताना उच्च न्यायालयाने वन्यजीव कायद्याच्या अधीन राहूनच नागपंचमी साजरी करण्याचे आदेश मागील वर्षी दिले होते. त्यामुळे जिवंत नागाची पूजा करण्यास बंदी आली होती. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी बत्तीस शिराळ्यातील गावकऱ्यांच्या शिष्टमंडळासह रविवारी पुण्यात जावडेकर यांची भेट घेतली. बत्तीश शिराळयातील नागपंचमीचा उत्सव संकटात आला असल्याने त्यावर मार्ग काढण्याची विनंती गावकऱ्यांनी जावडेकर यांच्याकडे केली.
शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर त्याबाबतची माहिती जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, प्राण्यांवर क्रूरता होऊ नये, याच्याशी आम्ही सहमत आहोत. मात्र बत्तीस शिराळ्यातील नागपंचमीची अनेक वर्षांची परंपरा आहे. ही परंपरा कायम राहून लोकांना नागांची पूजा करता आली पाहिजे. कायद्यातील तरतुदींनुसार न्यायालयाने या पूजेबाबत र्निबध घातले आहेत. त्यामुळे आम्ही कायद्यात बदल करणार आहोत.