भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटीचे संस्थापक प्रमोद रायसोनीसह पतसंस्थेच्या ११ संचालकांना आणखी एका अपहाराच्या गुन्ह्य़ात डेक्कन पोलिसांनी अटक केली आहे.
पतसंस्थेच्या घोले रस्ता शाखेतून ३ कोटी ४ लाख रुपयांच्या ठेवीचा अपहार केल्याच्या आरोपावरून ही अटक करण्यात आली आहे. या आरोपींवर फसवणुकीबरोबरच महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंरक्षण अधिनियम १९९९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी त्यांना विशेष न्यायालय के. सी. वढणे यांच्यासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
प्रमोद भाईचंद रायसोनी (वय ५४, रा. बळीराम पेठ, जळगाव), दिलीप कांतीलाल चोरडिया (वय ५१), मोतीलाल ओंकार जीरी (वय ४६), सूरजमल बभुतमल जैन (वय ५०), दादा रामचंद्र पाटील (वय ६७), भागवत संपत माळी (वय ६३), राजाराम काशीनाथ कोळी (वय ४७), भगवान हिरामण वाघ (वय ६०), डॉ. हितेश यशवंत महाजन (वय ६२), इंद्रकुमार आत्माराम ललवाणी (वय ४०), शेख रमजान शेख अब्दुल गनी मन्यार (वय ५५, सर्व. रा. जामनेर, जळगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी दीपा सुरेश गुरनानी (वय ५४, रा. गोखलेनगर) यांनी फिर्याद दिली होती. गुरनानी यांच्यासह १५ जणांनी पतसंस्थेच्या घोले रस्ता शाखेमध्ये २१ मार्च २०१३ ते १२ डिसेंबर २०१४ या कालावधीत मुदत ठेवी ठेवल्या होत्या. तक्रारदारांची मुदतपूर्ती झालेली रक्कम परत न करता आरोपींनी संगनमताने अपहार केला. त्यांनी ठेवीदारांच्या गुंतवणुकीचे हितसंरक्षण केले नाही.
आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. पतसंस्थेने मुदत ठेवीच्या स्वरूपात स्वीकारलेल्या रकमा हस्तगत करावयाच्या आहेत, आरोपींनी ठेवीदारांच्या रकमेतून स्वत:चे मित्र किंवा नातेवाईक यांना कर्ज दिले आहे काय, किंवा त्यांच्या नावे मालमत्ता खरेदी केली आहे काय याचा तपास करून पुराव्याचे कागदपत्र हस्तगत करायचे असल्याने आरोपींना पोलीस कोठडी द्यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील सुनील हांडे यांनी केला.