दारूचे व्यसन प्रयत्नपूर्वक सोडून नवीन आयुष्याला सुरूवात करू इच्छिणाऱ्यांना नोकरीची संधी मिळावी यासाठी ‘पद्मभूषण वसंतदादा पाटील शिक्षणसेवा संस्थे’ने पुढाकार घेतला आहे. व्यसन सोडल्यानंतर किमान एक वर्ष व्यसनापासून पूर्णपणे दूर राहिलेल्या व्यक्तींना या संस्थेतर्फे महंमदवाडी येथे उघडण्यात येणारे रुग्णालय व शाळा येथे नोकरीस प्राधान्य दिले जाणार असल्याची माहिती, संस्थेचे सचिव अॅड. गणेश देव यांनी दिली आहे.
देव म्हणाले, ‘‘व्यसनमुक्त व्यक्तींकडे समाजाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे या व्यक्ती निराश होऊन पुन्हा व्यसनाकडे वळण्याचा धोका अधिक असतो. असे होऊ नये या उद्देशाने व्यसनापासून एक वर्ष दूर राहिलेल्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार संस्थेचे रुग्णालय व शाळा या संस्थांमध्ये नोकरीत प्राधान्य दिले आहे.’’ इच्छुकांनी ७३८७९८४४८२, ९९७५२३३८५८ या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा, असे देव यांनी कळवले आहे.