पुणे रेल्वे स्थानक परिसरातील ४०० रिक्षाचालक संलग्न

पुणे रेल्वे स्थानक तसेच एसटी स्थानक येथे येणाऱ्या प्रवाशांसाठी वाहतूक पोलिसांनी ‘प्रीपेड रिक्षा’ योजना १ ऑगस्टपासून सुरू केली आहे. या योजनेशी सध्या चारशे रिक्षाचालक संलग्न असून मध्यरात्री येणाऱ्या प्रवाशांकडून अवाजवी भाडे आकारणीला या योजनेमुळे चाप बसला आहे.

मध्यरात्री येणाऱ्या प्रवाशांकडून अवाजवी भाडे आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी वाहतूक पोलिसांकडे आल्या होत्या. वाहतूक  शाखेचे तत्कालीन पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी प्रवाशांची लूट थांबविण्यासाठी पुणे स्थानकाच्या आवारात प्रीपेड रिक्षा सुरू करण्याची योजना आखली होती. काही वर्षांपूर्वी ही योजना सुरू करण्यात आली होती. मात्र, योजना बंद पडल्याने पोलीस उपायुक्त देशमुख यांनी प्रवाशांच्या सोयीसाठी ही योजना पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न केले. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून या योजनेला मंजुरी मिळाल्यानंतर १ ऑगस्टपासून ही योजना पुन्हा सुरू करण्यात आली.

याबाबत बंडगार्डन वाहतूक शाखेतील सहायक पोलीस निरीक्षक संभाजी गोलांडे म्हणाले,की पहिल्या टप्प्यात ही योजना दिवसा सुरू करण्यात आली होती. आता दिवसरात्र ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. प्रीपेड रिक्षा बुथच्या नियोजनाची जबाबदारी बंडगार्डन वाहतूक शाखेकडे सोपविण्यात आली आहे. पुणे रेल्वे स्थानकात दररोज हजारो प्रवासी ये-जा करत असतात. पुणे रेल्वे स्थानकात रात्री उशिरा अनेक रेल्वे गाडय़ा येतात. या गाडय़ांतून उतरलेल्या प्रवाशांना इच्छितस्थळी जाण्यासाठी रिक्षा तसेच प्रवासी सेवा देणाऱ्या मोटार वा पीएमपी हा पर्याय उपलब्ध आहे. अनेक प्रवासी रिक्षाने प्रवास करण्यास प्राधान्य देतात. प्रीपेड योजनेमुळे प्रवाशांची सोय झाली आहे.

प्रीपेड रिक्षा योजना पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात आरक्षण केंद्राजवळ आहे. या योजनेचे नियोजन करण्यासाठी दोन पोलीस नियुक्त करण्यात आले आहेत. पीएमपीकडून रेल्वे स्थानक परिसरात रात्रसेवा सुरू करण्यात आली आहे. ही सेवा मध्यरात्री रेल्वे स्थानकात येणाऱ्या प्रवाशांच्या दृष्टीने सोयीची आहे. रेल्वे स्थानकाच्या आवारात रिक्षा शिस्तीने थांबलेल्या असतात, त्यामुळे गोंधळ नसतो.

योजना काय?

‘प्रीपेड बूथ’ योजनेत संगणक उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्यात ‘प्रीपेड रिक्षा अ‍ॅप’ असून प्रवासी या अ‍ॅपच्या माध्यमातून त्यांना ज्या ठिकाणी जायचे आहे ते ठिकाण नमूद करतात. त्यानंतर पुणे रेल्वे स्थानकातून इच्छित ठिकाणचे अंतर, रिक्षा भाडे याबाबत माहिती देणारी पावती प्रवाशांना मिळते. त्यामुळे ही योजना पूर्णपणे पारदर्शक असल्याची माहिती बंडगार्डन वाहतूक विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक संभाजी गोलांडे यांनी सांगितली.