मेट्रो प्रकल्पाच्या पाच किलोमीटर लांबीच्या भुयारी मार्गिकेसाठी अत्याधुनिक टीबीएम यंत्राचा वापर केला जाणार असून ही यंत्रणा जहाजांमधून प्रवास करत ऑक्टोबर महिन्यात शहरात येणार आहे. हाँगकाँगस्थित कंपनीला हे काम देण्यात आले असून डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ापासून मेट्रोच्या भूमिगत मार्गिकेच्या कामाला प्रत्यक्षात प्रारंभ होणार आहे.

मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत कृषी महाविद्यालय ते स्वारगेट ही पाच किलोमीटर लांबीची मार्गिका भुयारी आहे. शहराच्या अत्यंत दाट लोकवस्ती आणि व्यापारीदृष्टय़ा महत्त्वाच्या ठिकाणांना या भुयारी मेट्रो मार्गाद्वारे जोडले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना दळणवळणाचा एक नवीन पर्याय उपलब्ध होणार आहे. भुयारी मार्गाचे काम अत्यंत किचकट, खर्चिक आणि जोखमीचे असल्यामुळे या कामांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय झाला असून पाच किलोमीटर लांबीच्या भुयारी मार्गासाठी चार टनेल बोरिंग मशीनचा वापर करण्यात येणार आहे. त्यापैकी दोन टनेल बोअरिंग यंत्रणा टेरा टेक या हाँगकाँगस्थिती कंपनीकडून घेण्यात येणार आहेत. त्यानुसार ही यंत्रे जहाजाद्वारे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात दाखल होणार आहेत. कृषी महाविद्यालय आणि स्वारगेट येथील शाफ्टमध्ये टनेल बोअरिंग मशीन उतरविण्यात येईल, त्याची जुळणी केली जाईल. त्यानंतर डिसेंबरपासून भुयारी मार्गाच्या कामांना प्रारंभ होणार आहे.

या प्रकारच्या यंत्रांचा वापर दिल्ली आणि मुंबई मेट्रो कामांसाठी करण्यात आला आहे. यंत्राचा व्यास ६.६५ मीटर असून लांबी १२० मीटर आहे. टीबीएमद्वारे तुकडे केलेले दगड भुयाराच्या बाहेर आणले जातात आणि ते रस्ते किंवा सिमेंट काँक्रिटमध्ये वापरले जाऊ शकतात. भुयार करताना पाण्याच्या स्रोतांचा या यंत्रणेवर कोणताही परिणाम होणार नाही, अशी माहिती महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी दिली.

मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत शहरात वनाज ते रामवाडी आणि स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड या मार्गिकेची कामे सध्या सुरू आहेत. त्यापैकी पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गिकेअंतर्गत कृषी महाविद्यालय ते स्वारगेट ही पाच किलोमीटर लांबीची मार्गिका भुयारी आहे. या मार्गिकेमध्ये शिवाजीनगर बसस्थानक, शिवाजीनगर सत्र न्यायालय, फडके हौद, मंडई आणि स्वारगेट ही पाच भूमिगत स्थानके आहेत. त्यापैकी फडके हौद चौकातील स्थानक बदलण्यात आले असून ते महापालिकेच्या दादोजी कोंडदेव शाळेजवळ प्रस्तावित करण्यात आले आहे.

हानी होणार नाही याची दक्षता

भुयारी मार्गाचे काम करताना घरे आणि इमारतींचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणामध्ये मार्गाच्या दोन्ही बाजूला पन्नास मीटर भूभागावरील प्रत्येक घराच्या प्रत्येक भिंतीचे छायाचित्र घेण्यात येणार आहे. भुयारी मार्गाचे काम करताना टीबीएममुळे घरांना काही हानी होणार नाही, याची दक्षता घेतली जाणार आहे. या यंत्रामुळे घरांना कोणतीही हानी पोहोचणार नाही, असे डॉ. दीक्षित यांनी सांगितले.