भाजपमध्ये मोर्चेबांधणीला थारा नाही; मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती

पिंपरी : पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदासाठी निर्माण झालेली उत्कंठा पराकोटीला गेली असून, दावेदार उमेदवारांच्या समर्थकांनी नेत्यांच्या गाठीभाठी घेण्याचा सपाटा लावला आहे. पिंपरी भाजप नगरसेवकांच्या एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असता, झालेल्या चर्चेत महापौरपदासाठी आपण जातिपाती आणि विभागवार समीकरणापेक्षा गुणवत्तेला प्राधान्य देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाजपमध्ये एखाद्या पदासाठी ‘लॉबिंग’ करणे या प्रकाराला थारा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पिंपरी पालिकेत भाजपचे निर्विवाद वर्चस्व आहे. महापौरपदाची उमेदवारी मिळेल, त्या नगरसेवकास महापौर होण्यात काहीच अडचण येणार नाही. त्यामुळे उमेदवारी मिळवण्यासाठी भाजपमध्ये तीव्र चढाओढ आहे. महापौरपदाच्या उमेदवारीवर मुख्यमंत्र्यांच्या संमतीनंतर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या मार्गाने मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न इच्छुक नगरसेवकांकडून सुरू आहे. रविवारी भाजपच्या सुमारे ३५ नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांची मुंबईत ‘वर्षां’ निवासस्थानी भेट घेतली. जवळपास २० मिनिटांच्या चर्चेत महापौरपदासाठी मावळ लोकसभेच्या कार्यक्षेत्रातील उमेदवार देण्याची एकमुखी मागणी या नगरसेवकांनी केली. पहिले महापौरपद शिरूर लोकसभा मतदारसंघात होते. यंदा ते मावळ मतदारसंघात द्यावे. गेल्या वेळी ग्रामीण भागाला होते. आता ते शहरी भागात द्यावे. अनुभवी नगरसेवकास संधी दिल्यास पक्षाला उपयोग होईल. सर्वाचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वत:ची भूमिका स्पष्ट केली. भाजपमध्ये कोणत्या भागातील अथवा कोणत्या जातिपातीचा आहे, हे पाहून पद देण्याची पद्धत नाही. पदासाठी ‘लॉबिंग’ करण्याचे प्रकार भाजपमध्ये चालत नाहीत. तुमच्या भावना लक्षात आल्या आहेत. गुणवत्ता पाहून महापौरपदाचा निर्णय केला जाईल. तत्पूर्वी, सर्व संबंधितांशी चर्चा करून अंतिम नाव निश्चित केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर उपस्थित नगरसेवकांनी समाधान व्यक्त केले असले तरी महापौरपदाचे नाव मात्र अद्यापही गुलदस्त्यातच राहिले आहे.