जादूटोणाविरोधी विधेयकाच्या मसुद्याला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली असून येत्या पावसाळी अधिवेशनात हे विधेयक संमत करू, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 
जादूटोणाविरोधी प्रस्तावित कायद्याचा नवा मसुदा समाजकल्याण विभागाने केला असून मसुद्याला अद्याप मंत्रिमंडळाची मंजुरी मिळालेली नसल्याचे संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले होते. या कायद्याला आक्षेप असणाऱ्या सर्वाशी चर्चा करण्याची सरकारची तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या कायद्याच्या भवितव्याविषयी प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, या विधेयकाचा मसुदा मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर झाला असल्याची माहिती पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये जादूटोणाविरोधी विधेयक संमत करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
वाढत्या शहरीकरणामुळे भाजीपाला क्षेत्र कमी झाले आहे. त्यामुळे नागरिकांना जादा दराने भाजीपाला घ्यावा लागत आहे. या पाश्र्वभूमीवर कमीत कमी दरामध्ये शहरातील लोकांना भाजी मिळावी यासाठी पणन विभागाने निश्चित धोरण आखून त्याची अंमलबजावणी केली पाहिजे, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. केंद्र सरकारच्या फलोत्पादन विकासामधून (हॉर्टिकल्चर मिशन) राज्यासाठी काही करता येईल का या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.