रुग्णवाहिका चालकांकडून अडवणूक

पिंपरी : वाढत्या करोना रुग्णसंख्येमुळे शासकीय यंत्रणेवर एकीकडे ताण आलेला असतानाच, खासगी रुग्णालयांमध्ये करोनाबाधितांना लुटण्याचे आणि शक्य त्या ठिकाणी अडवणूक करण्याचे उद्योग पिंपरी-चिंचवड शहरात सर्रास सुरू आहेत. रुग्णांसाठी रुग्णवाहिका देताना तथा मृतांसाठी शववाहिनी उपलब्ध करून देण्यासाठी अव्वाच्या सव्वा पैशांची मागणी करत अडवणूक होत असूनही पालिकेचे मात्र त्यावर कोणतेही नियंत्रण नसल्याचे दिसून येते.

खासगी रुग्णालयांतील गैरकारभारावरून होणाऱ्या तक्रारींची दखल घेऊन मंत्र्यांनी तथा सनदी अधिकाऱ्यांनी कितीही तंबी दिलेली असली तरी, खासगी रुग्णालयांमध्ये करोनाबाधितांची लूट सुरूच आहे. अवास्तव देयके आकारली जात असल्याच्या कितीही तक्रारी प्राप्त झाल्या तरी, महापालिकेकडून केवळ कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा मागवण्यात येतो. त्यापुढे काहीच होत नाही. या दरम्यान नेमक्या कोणत्या तडजोडी होतात, हे गुलदस्त्यातच आहे. आजपर्यंत शहरातील एकाही खासगी  (तक्रारी असलेल्या) रुग्णालयावर कारवाई करण्याची धमक पालिकेने दाखवलेली नाही.

दुसरीकडे रुग्णवाहिकाचालकांकडून होणाऱ्या अडवणुकीमुळे रुग्णांचे नातेवाईक हैराण आहेत. रुग्णांना आणण्यापासून ते घरी सोडण्यापर्यंतच्या टप्प्यात रुग्णवाहिका वेळेवर मिळत नाहीत. पालिकेच्या रुग्णवाहिका मिळवणे हे दिव्यच असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. खासगी रुग्णवाहिकांकडून अवास्तव पैसे आकारले जातात. त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नाही.

‘सीटी स्कॅन’ यंत्र बंदच

यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील सीटी स्कॅनचे मशीन अनेकदा बंदच ठेवण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालयात जावे लागते. तेथे अव्वाच्या सव्वा शुल्क आकारले जाते. अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून देण्यात आल्यानंतर याबाबत चौकशी करू, असे ते म्हणाले.

करोनाच्या संकटकाळातही डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे. रुग्णांविषयीच्या तक्रारींवर पालिका अधिकारी तत्काळ निर्णय घेत नाहीत. महत्त्वाची जबाबदारी असणारे दूरध्वनी स्वीकारत नाहीत की संदेशांना उत्तरे देत नाहीत. वरिष्ठांमध्ये एकमेकांवर खापर फोडण्याचे उद्योग सुरू असतात. या सर्व गोष्टींचा परिणाम वैद्यकीय सेवेवर होतो.

– मारुती भापकर, सामाजिक कार्यकर्ता