यंदाच्या वर्षांत नवव्या चक्रीवादळाची शक्यता

पुणे : अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये यंदाच्या वर्षी निर्माण झालेल्या चक्रीवादळाची संख्या विक्रमाच्या दिशेने जात आहे. यापूर्वी केवळ दोनदाच वर्षांत एकूण दहा चक्रीवादळे निर्माण झाली होती. सध्या अरबी समुद्रात पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असून, त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास ते यंदाच्या वर्षांतील नववे चक्रीवादळ ठरेल.

देशात नैऋत्य मोसमी वाऱ्यांचे आगमन होण्यापूर्वी पाबुक, फणी आणि वायू ही तीन चक्रीवादळे निर्माण झाली होती. मोसमी पावसाच्या काळात हिका या एका चक्रीवादळाची निर्मिती झाली. मोसमी पाऊस देशातून परतल्यानंतर एकूण चार चक्रीवादळे निर्माण झाली. त्यात क्यार, महा, बुलबुल आणि पवन या चक्रीवादळांचा समावेश होता. मोसमी पाऊस परतल्यानंतरही समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळाची संख्याही यंदा विक्रमी ठरली आहे. त्यामुळे थंडीचा हंगाम सुरू होऊनही  ढगाळ स्थिती निर्माण होऊन अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली.

अरबी समुद्रामध्ये पवन हे यंदाचे शेवटचे चक्रीवादळ होते. त्याचा प्रभाव ओसरल्यानंतर राज्यात बहुतांश भागात थंडी जाणवू लागली आहे. अशातच सध्या वातावरणातील दोन थरांमध्ये वाऱ्याच्या वेगात तफावत निर्माण झाली आहे. उबदार तापमानामुळे अरबी समुद्रात कमी दाबाचे रूपांतर होण्याचे संकेत आहेत. तसे झाल्यास हे या वर्षांतील नववे चक्रीवादळ ठरेल. यापूर्वी १८९३ आणि १९३० या वर्षी समुद्रात १० चक्रीवादळे निर्माण झाली होती.