विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यासाठीची कार्यपद्धती (एसओपी) गुरुवारी जाहीर केली. करोना संसर्ग टाळण्यासाठी तापमान तपासणी, सॅनिटायझर, मुखपट्टीचा वापर आदी सूचना देत ‘यूजीसी’ने या परीक्षा होणारच असल्याचे अधोरेखित केले आहे.

देशभरातील विद्यापीठांना अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याबाबत ‘यूजीसी’ने ६ जुलैला सुधारित मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. त्यानुसार प्रत्यक्ष लेखी परीक्षा किंवा ऑनलाइन किंवा मिश्र पद्धतीने सप्टेंबर अखेपर्यंत परीक्षा घेण्याची मुभा विद्यापीठांना देण्यात आली. या पाश्र्वभूमीवर विद्यापीठे आणि महाविद्यालयांना परीक्षा घेण्याबाबतची कार्यपद्धती ‘यूजीसी’च्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 सूचना काय?

० परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना संसर्ग होऊ नये, यासाठी संपूर्ण परीक्षा केंद्रातील भिंती, दरवाजे, प्रवेशद्वारे, खुच्र्या र्निजतुक कराव्यात.

० परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारावर सॅनिटायझर ठेवावे. परीक्षा केंद्रातील कर्मचाऱ्यांनी हातमोजे आणि मुखपट्टीचा वापर करावा.

० परीक्षा केंद्रावरील प्राध्यापक, कर्मचाऱ्यांकडून त्यांना कोणताही त्रास होत नसल्याचे हमीपत्र घ्यावे. परीक्षा केंद्रात प्रवेश करताना विद्यार्थी आणि प्राध्यापक, कर्मचाऱ्यांच्या शरीराचे तापमान तपासावे.

० सर्व विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना आरोग्य सेतु अ‍ॅप बंधनकारक करावे. सुरक्षित अंतर राखण्यासाठी ठिकठिकाणी फलक लावावेत. विद्यार्थी, कर्मचाऱ्यांना परीक्षा केंद्रात सोडताना एका वेळी एकाच व्यक्तीला सोडावे. तसेच प्रवेशद्वारावर दोन मीटर अंतर राखणारे चौकोन आखावेत.

बैठक व्यवस्था आणि ओळखपत्र

विद्यार्थ्यांच्या बैठक व्यवस्थेत दोन विद्यार्थ्यांमधील एक आसन रिकामे ठेवण्यात यावे. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी देण्यात येणारे प्रवेशपत्र, कर्मचाऱ्यांना त्यांचे ओळखपत्र परीक्षा केंद्रावर येण्या-जाण्यासाठीचा पास म्हणून ग्राह्य़ धरण्यात यावा. याबाबत राज्य शासनाने स्थानिक प्रशासनाला सूचना द्याव्यात, असे ‘एसओपी’मध्ये नमूद करण्यात आले आहे.

कायद्यानुसार विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचना विद्यापीठांसाठी बंधनकारक आहेत. आयोग विद्यापीठांची नियामक संस्था आहे. त्यामुळे राज्य शासनाला विश्वासात घेणे, हे आयोगाच्या कक्षेत येत नाही.

-डॉ. भूषण पटवर्धन, उपाध्यक्ष, यूजीसी