महापालिकेत समाविष्ट झालेल्या तेवीस गावांमधील टेकडय़ांच्या जागा वनीकरणासाठी ताब्यात घेऊन त्या मोबदल्यात जागामालकांना ‘ग्रीन टीडीआर’ देण्याच्या प्रस्तावावर हरकती-सूचना घेण्याची प्रक्रिया राज्य शासनाकडून सुरू करण्यात आली आहे.
तेवीस गावांमधील टेकडय़ांवर बांधकाम परवानगी देण्याबाबत अनेक वर्षे वाद सुरू होता. अखेर या सर्व टेकडय़ांवर जैववैविध्य उद्यानाचे (बायोडायव्हर्सिटी पार्क- बीडीपी) आरक्षण दर्शवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. हे क्षेत्र ९७८ हेक्टर इतके असून या जागांची मालकी ज्यांच्याकडे आहे, त्यांना जागेच्या मोबदल्यात आठ टक्के ग्रीन टीडीआर देण्याचा प्रस्ताव आहे.
बीडीपीचे आरक्षण दर्शविलेल्या जागा ताब्यात घेण्यासाठी जागा मालकांना टीडीआर देण्याच्या प्रस्तावाबाबत हरकती-सूचनांची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून ८ मार्चपासून पुढे शासकीय कामकाजाचे तीस दिवस एवढी त्यासाठीची मुदत आहे. महापालिका आयुक्त कार्यालय, महापालिका भवन, उपसंचालक, नगरनियोजन विभाग पुणे यांचे सहकारनगर येथील कार्यालय आणि नगरनियोजन विभाग, सहसंचालक कार्यालय, नारायण पेठ यापैकी कोणत्याही कार्यालयात लेखी स्वरुपातील हरकती-सूचना नागरिकांना सादर करता येतील.