अज्ञान आणि अंधश्रद्धेमध्ये गुरफटलेल्या समाजाला विवेकवादी आणि विज्ञाननिष्ठ बनविण्यासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी आयुष्य वेचले. त्यांच्या हत्येनंतर एक महिन्यानेही सरकार मारेक ऱ्यांना अटक करू शकले नाही. प्रकाशाला घाबरणाऱ्या सध्याच्या भेकड राज्यकर्त्यांकडून सामाजिक न्यायाची कसली अपेक्षा करणार, असा परखड सवाल ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष प्रा. एन. डी. पाटील यांनी शनिवारी केला. अशा सरकारचा निषेध हा त्यांच्या या कृतीतूनच झाला असल्याची टीकाही त्यांनी केली.
डॉ. दाभोलकर यांच्या हत्येला एक महिना पूर्ण झाल्याच्यानिमित्ताने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर निषेध आणि धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव, डॉ. हमीद दाभोलकर, डॉ. शैला दाभोलकर, दीपा श्रीराम, डॉ. एच. एम. देसर्डा, प्रा. सुभाष वारे, अरिवद कपोले, सय्यदभाई, सुरेश खोपडे, राजेंद्र कांकरिया, अविनाश पाटील, मििलद देशमुख, अजित अभ्यंकर यांच्यासह विविध संस्था-संघटनांचे प्रतिनिधी यामध्ये सहभागी झाले होते. दाभोलकर यांच्या हत्येचे मारेकरी आणि या कटाचा सूत्रधार येत्या दोन ऑक्टोबपर्यंत न सापडल्यास मुंबईमध्ये आंदोलन करण्याचा इशारा समितीने दिला.
प्रा. पाटील म्हणाले, उजेडाला घाबरणारा दिवाभीतांचा वर्ग समाजामध्ये पूर्वीपासूनच आहे. त्याविरोधात दाभोलकर आयुष्यभर लढत राहिले. सध्याच्या राज्यकर्त्यांकडे विवेक नाही आणि विज्ञानवादही नाही. हे प्रकाशाच्या तेजाला घाबरणारे भेकड राज्यकर्ते आहेत. त्यांच्याकडून सामाजिक न्यायाची अपेक्षा करता येणार नाही. तरुणांच्या सदसद्विवेकावर माझा विश्वास असून त्यांनाच साद घालून चळवळीचा क्षीण झाल्यासारखा आवाज पुन्हा एकदा बुलंद करायचा आहे.
पोलीस चौकीमध्ये देऊळ उभारणाऱ्या गंडेधारी पोलिसांकडून दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांचा तपास लागेल अशी अपेक्षा करण्यात अर्थ नाही, अशा शब्दांत डॉ. बाबा आढाव यांनी सरकारवर हल्ला चढविला. दाभोलकर हे त्या दिवशी पुण्यात आहेत आणि सकाळी फिरावयास जाणार आहेत हे मारेक ऱ्यांना कसे समजले असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यामध्ये काही स्थानिक शक्ती असाव्यात, असा संशय व्यक्त करीत आढाव म्हणाले,की चौकीमध्ये देऊळ उभारणारे पोलीस हेदेखील अंधश्रद्धेचे बळी असून निम्म्या राज्यकर्त्यांच्या हातामध्ये गंडे आहेत. अशा मंडळींकडून तपास कसा होईल?
प्रतिगाम्यांबरोबरच आपल्यातील िहसक वृत्ती, अविवेकवाद आणि अकृतीशीलतेशी आपली लढाई असल्याचे सांगून हमीद दाभोलकर यांनी या लढाईचे हुंकार केवळ सामाजिक पातळीवर नव्हे तर, राजकीय पातळीवरही उमटणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
राजीनामा नको.. आबा,
मानधन घेऊ नका
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर आर. आर. पाटील यांची वक्तव्ये ही गृहमंत्र्याची वाटतच नाहीत, तर ते एखाद्या कार्यकर्त्यांप्रमाणे बोलत आहेत. ते स्वत:ला पुरोगामी-परिवर्तनवादी म्हणवून घेत असतील तर, दाभोलकर यांच्या खुनाला वाचा फुटेपर्यंत, राजीनामा नको, पण किमान त्यांनी मानधन घेणार नाही असे तरी जाहीर करावे, असे आवाहन डॉ. बाबा आढाव यांनी केले.