ज्येष्ठ राजकीय विश्लेषक-विचारवंत आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. यशवंत सुमंत (वय ५७) यांचे शनिवारी पहाटे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी आणि दोन मुलगे असा परिवार आहे. प्रसिद्ध नाटककार धर्मकीर्ती सुमंत हे त्यांचे चिरंजीव होत.
‘सुमंत’ स्मरण..
प्रा. सुमंत गेल्या चार महिन्यांपासून आजारी होते. त्यांना प्रकृती खालावल्याने गुरुवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. मात्र, अचानक मेंदूला होणारा रक्तपुरवठा थांबला. प्रकृतीची गुंतागुंत वाढल्याने त्यांच्यावरील उपचारांना यश आले नाही आणि शनिवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. प्रा. यशवंत सुमंत यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, आमदार जयदेव गायकवाड, डॉ. कुमार सप्तर्षी, डॉ. सुहास पळशीकर, अतुल पेठे, मुक्ता मनोहर, रामनाथ चव्हाण यांच्यासह शिक्षण, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते आणि सुमंत यांचे विद्यार्थी मोठय़ा संख्येने या वेळी उपस्थित होते.
सावित्रीबाई फुले विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी संपादन केल्यानंतर यशवंत सुमंत यांनी मॉडर्न महाविद्यालयामध्ये १९७७ ते १९८९ या कालखंडात अध्यापन केले. त्यानंतर ते विद्यापीठाच्या राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन विभागामध्ये रुजू झाले. विद्यापीठाच्या स्पर्धात्मक परीक्षा विभाग, वृत्तपत्रविद्या आणि संज्ञापन विभाग, आंतरराष्ट्रीय केंद्र, मराठवाडा मित्रमंडळाचा पत्रकारिता अभ्यासक्रम यांसह शिवाजी विद्यापीठ आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ येथे त्यांनी अध्यापन केले. ‘महाराष्ट्रातील सहावी लोकसभा : १९७७’, ‘महाराष्ट्रातील राजकीय विचार’ आणि ‘इमर्जिग पॅटर्नस् ऑफ लीडरशिप इन इंडिया’ या विषयांवर त्यांनी संशोधनपर लेखन केले. सुमंत यांना महाराष्ट्र साहित्य परिषद आणि महाराष्ट्र फाऊंडेशनच्या पुरस्कारांसह राज्य सरकारच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. ते सातारा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अॅकॅडमीचे कार्यकारी संचालक आणि वाई येथील प्राज्ञ पाठशाळेच्या ‘नव-भारत’ या मराठी नियतकालिकाच्या संपादक मंडळाचे सदस्य होते. ‘माओनंतरचा चीन’, ‘१९१४ ते १९२० या काळातील टिळकांचे राजकारण’, ‘राजकीय अभिजन’, ‘मार्क्सची इतिहासविषयक संकल्पना’, ‘स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांचे अंधश्रद्धा निर्मूलनविषयक विचार’, ‘राखीव जागांची तात्त्विक बैठक फुल्यांचीच’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि जातिअंताचा लढा’, ‘न्यायमूर्ती रानडे यांचा समाज सुधारणावाद’, ‘स्वामी विवेकानंदांचे सामाजिक विचार’, ‘सावरकरांचे िहसाविषयक तत्त्वज्ञान’, ‘बहुजनवाद आणि समाजवाद’, ‘आगरकरांचे स्त्री प्रश्नांसंबंधीचे चिंतन’, ‘आगरकरप्रणीत धर्मचिकित्सेचा राजकीय आशय’, ‘मराठी वैचारिक साहित्य : स्वरूप आणि प्रेरणा’, ‘गांधी विचारांतील समता संकल्पना’, ‘सामाजिक चळवळी-काही निरीक्षणे’, ‘राजसंस्थेचा क्षय’, ‘जात वर्ग आणि सामाजिक राजकारण’ या विषयांवर त्यांचे लेखन प्रसिद्ध आहे. गांधीविचार आणि आजची परिस्थिती याविषयी सखोल मांडणी करणारे विचारवंत ही त्यांची ख्याती होती. ‘विवेकानंद साधक की हिंदूुत्वाचे प्रचारक’ आणि ‘ओळख स्त्रीवादाची’ ही त्यांची दोन पुस्तके नुकतीच प्रसिद्ध झाली होती.