विद्यार्थ्यांशी संवाद साधताना अश्लील विधाने करणाऱ्या एका प्राध्यापकाला बुधवारी चांगलाच धडा मिळाला. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा उद्रेक आणि राजकीय पक्षांच्या आंदोलनाची दखल घेऊन या प्राध्यापकास तडकाफडकी सेवामुक्त करण्याचा निर्णय संस्थाचालकांनी घेतला.
निवांत कांबळे असे या प्राध्यापकाचे नाव आहे. चिंचवडच्या संघवी केसरी महाविद्यालयात इंग्रजी वाङ्मय ते शिकवत होते. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते अश्लील संवाद साधतात, अशा त्यांच्याविषयी पूर्वीपासून तक्रारी होत्या. शनिवारी वर्गात शिकवत असताना एका पाश्चात्त्य लेखकाचा संदर्भ देत, कांबळेंनी, बलात्कार होत असल्यास तो एन्जॉय करावा, अशी मुक्ताफळे उधळली. त्यामुळे विद्यार्थी चिडले. संतापलेल्या विद्यार्थिनींनी प्राचार्याकडे तक्रार केली. तथापि, अपेक्षित कारवाई झाली नाही. त्यामुळे विद्यार्थी अधिकच भडकले.
याबाबतची माहिती बाहेर गेल्याने शिवसेनेच्या गटनेत्या सुलभा उबाळे, मनसेचे अनंत कोऱ्हाळे, सचिन चिखले, काँग्रेसचे नरेंद्र बनसोडे, मयूर जैस्वाल आदी नेते कार्यकर्त्यांसह महाविद्यालयात धडकले. आक्रमक पवित्रा घेत कांबळे यांच्यावर कारवाईची मागणी त्यांनी केली. संस्थेच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत पोलिसांकडे तक्रार न करता कांबळे यांना सेवामुक्त करण्याची ग्वाही संस्थाचालकांनी दिली. संबंधित प्राध्यापकाने माफी मागितली. त्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला. या वेळी विद्यार्थ्यांच्या वतीने, अंशकालीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना होणारी सक्ती मागे घ्यावी, खेळाडू विद्यार्थ्यांना आवश्यक सहकार्य दिले जावे, बदललेल्या प्राध्यापकांना पूर्ववत काम द्यावे, या मागण्या करण्यात आल्या, त्याची दखल घेण्याची हमी संस्थेने दिली.