पुणे विद्यापीठ विविध शैक्षणिक सुविधा पुरवण्यासाठी ‘पुनेक्स’ या नव्या डिजिटल प्रणालीची निर्मिती करण्यासाठी प्रयत्नशील असून विद्यापीठ अनुदान आयोगाच्या ‘इनोव्हेटिव्ह युनिव्हर्सिटी’ या योजनेसाठी पुणे विद्यापीठाकडून हा प्रकल्प पाठवण्यात आला असल्याचे विद्यापीठातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
विद्यापीठ अनुदान आयोगाने देशभरातील विद्यापीठांसाठी ‘इनोव्हेटिव्ह युनिव्हर्सिटी’ योजना जाहीर केली आहे. त्यासाठी पुणे विद्यापीठाकडून ‘पुनेक्स’ हा प्रकल्प पाठवण्यात आला आहे. ‘पुनेक्स’ ही एक डिजिटल प्रणाली आहे. त्यानुसार विद्यापीठातील सर्व विभाग आणि संलग्न महाविद्यालये जोडण्यात येणार असून त्यामध्य ई-गव्हर्नन्सची सुविधाही आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी सर्वासाठी ही प्रणाली महत्त्वाची ठरणार आहे. शिक्षण अधिक प्रभावी होण्यासाठी प्रयोगावर आधारित आणि त्वरित प्रतिक्रियांवर आधारित शिक्षण पद्धती या प्रणालीमध्ये अवलंबण्यात आली आहे. या प्रणालीचा वापर व्यक्तिगत शिक्षणासाठी आणि सामूहिक शिक्षणासाठीही करता येणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांची तयारी पाहण्यासाठी पर्याय उपलब्ध आहेत. ऑनलाइन परीक्षा, अभ्यासक्रमाची उजळणी असे विविध पर्याय विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत.
या प्रणालीच्या निर्मितीसाठी सिडॅक, महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (एमकेसीएल), महाराष्ट्र स्मॉल स्केल इन्डस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एमएसएसआयडीसी) आणि नॅशनल इन्डस्ट्रियल डेव्हलपमेंड कॉर्पोरेशन (एनआयडीसी) या संस्थाकडून सहाय्य घेण्याचा विचार विद्यापीठ पातळीवर सुरू आहे.