बालकामगार कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची धमकी देऊन एकाकडून सहा हजारांची लाच घेणाऱ्या हिंजवडी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाला पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी दुपारी बावधन पोलीस चौकीच्या आवारात ही कारवाई केली.
बसवराज धोंडोप्पा चित्ते असे लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक चित्ते हे हिंजवडी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या बावधन पोलीस चौकीत नेमणुकीस आहेत. तेथील एका गाडय़ा धुण्याच्या व्यवसाय करणाऱ्या तरुणाकडे बालकामगार कामाला आहेत, अशी तक्रार बावधन पोलिसांकडे आली होती. त्यानुसार त्याला पोलीस चौकीत बोलावून घेण्यात आले होते. उपनिरीक्षक चित्ते यांनी बालकामगार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करतो,अशी धमकी दिली होती.
गाडय़ा धुण्याचा व्यवसाय करणाऱ्या तरुणाकडे गुन्हा दाखल न करण्यासाठी पंधरा हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. तरुणाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. त्यानंतर मंगळवारी दुपारी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त श्रीहरी पाटील आणि त्यांच्या पथकाने सापळा रचून उपनिरीक्षक चित्ते यांना सहा हजारांची लाच घेताना पकडले.