ग्रंथ देवघेवीतून करोना संसर्ग होण्याची शक्यता असल्याचे कारण देत राज्यातील सर्व सार्वजनिक ग्रंथालये ३१ ऑगस्टपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे १२ हजार सार्वजनिक ग्रंथालयांची सेवा बंद राहणार आहे.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून राज्यातील सर्व शासकीय ग्रंथालये, शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालये, जिल्हा ग्रंथालय संघ, संशोधन संस्थांनी चालविलेली शासनमान्य ग्रंथालये अशा सर्वानी ग्रंथालय सेवा, अभ्यासिका, वाचन कक्ष या सेवा ३१ ऑगस्टपर्यंत बंद ठेवाव्यात, असे परिपत्रक ग्रंथालय संचालनालयाचे प्रभारी ग्रंथालय संचालक सुभाष राठोड यांनी काढले आहे. त्याचप्रमाणे अधिवेशन, कार्यशाळा,  चर्चासत्र, ग्रंथोत्सव यांसारख्या कार्यक्रमांचे आयोजन करू नये, असेही या आदेशामध्ये नमूद केले आहे.

ग्रंथालयामध्ये ग्रंथ देवघेव कक्षामध्ये आणि वाचन कक्षामध्ये येणाऱ्या वाचकांमुळे ग्रंथालयामध्ये गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे करोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ग्रंथालयामध्ये येणारे वाचक आणि ग्रंथालय सेवक यांना करोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता विचारात घेऊन ग्रंथालय सेवा आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यास ३१ ऑगस्टपर्यंत प्रतिबंध करण्यात आला असल्याचे राठोड यांनी या आदेशामध्ये नमूद केले आहे.

विभागनिहाय ग्रंथालये

पुणे – ४ हजार २६९

अमरावती – २ हजार ४१

औरंगाबाद – ४ हजार २६९

नागपूर – १ हजार १०८

नाशिक – १ हजार ६७०

मुंबई – ६२२