समाजामध्ये नैतिक अहंकार वाढत आहे. विचारवंतांची लबाडी आणि दांभिकता दिसते. त्या पाश्र्वभूमीवर सचोटीने उद्योग करून संपत्ती निर्माणाच्या क्षेत्रातील टाटांची कामगिरी अद्भुत स्वरूपाची आहे, असे मत ‘लोकसत्ता’चे संपादक आणि प्रसिद्ध लेखक गिरीश कुबेर यांनी रविवारी व्यक्त केले. माणसांच्या प्रेरणांविषयीच्या कुतूहलातून आजवरचे लेखन झाले, असेही त्यांनी सांगितले.
अक्षरधारातर्फे आयोजित ‘दीपावली शब्दोत्सवा’मध्ये गिरीश कुबेर यांच्या ‘टाटायन’ या पुस्तकाच्या सहाव्या आवृत्तीचे प्रकाशन प्रसिद्ध उद्योजक डी. एस. कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. राजहंस प्रकाशनच्या सहकार्याने अक्षरधाराने ही आवृत्ती प्रकाशित केली आहे. ‘राजहंस’चे  डॉ. सदानंद बोरसे आणि अक्षरधाराच्या संचालिका रसिका राठिवडेकर या वेळी उपस्थित होत्या. उत्तरार्धात प्रसिद्ध अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी कुबेर यांची मुलाखत घेतली.
कुबेर म्हणाले, भारतामध्ये टाटा हे एकच उद्योगपती तर, बाकीचे केवळ गल्ल्याकडे बघणारे बनिया म्हणजेच व्यापारी आहेत. गल्ल्याच्या पलीकडे जाऊन टाटांनी समाजासाठी खूप काही केले आहे. त्यांच्यासारखी दूरदृष्टी असलेला उद्योजक आजवर झालाच नाही. त्यांनी ‘अच्छे दिन’ शब्द वापरले नाहीत. पण, करून दाखविले. अन्य उद्योगांमध्ये संचालक मंडळावर बहुतांशी त्याच कुटुंबातील व्यक्ती असतात. मात्र, टाटा उद्योगसमूहाच्या मालकीमध्ये टाटांची मालकी एक टक्कादेखील नव्हती. जे. आर. डी. टाटा यांची दोनदा ओझरती भेट झाली होती. रतन टाटा यांची सविस्तर मुलाखत घेण्याचा योग दोनदा आला. संकटांना सामोरे जात उद्योगाचा आणि उद्योगाबरोबरच देशाचा विकास टाटा उद्योगसमूहाने केला. गरिबीच्या स्थितीमुळे साधेपणा हा गुण ठरू शकत नाही. त्या साधेपणाचे कसले कौतुक मिरवायचे? महालामध्ये राहण्याची परिस्थिती आणून मग साधेपणा मिरवावा. संपत्ती निर्माणाच्या क्षेत्रात अद्भुत कामगिरी करूनही लाभांपासून दूर राहणारे टाटा हे ‘उपभोगशून्य स्वामी’ आहेत.
लोक वाचत नाहीत हे खोटं आहे. उलट वेगवेगळ्या विषयांवर होणारी साहित्य निर्मिती लोक आवर्जून वाचत आहेत. अर्थात कथा-कादंबऱ्या वाचल्या नाहीत तर मराठीचे भले होईल. वाचकांना या वेगळ्या विषयांची गरज आहे. लेखन करणारा मी केवळ निमित्तमात्र आहे, असे कुबेर यांनी सांगितले.
डी. एस. कुलकर्णी म्हणाले, चांगल्या अर्थाने ‘संधीसाधू’पणा उद्योगामध्ये यशस्वी करतो हे टाटांनी दाखवून दिले. असे किमान शंभर टाटा निर्माण होऊ शकले तर ‘अच्छे दिन’ जरूर येतील. टाटांची कार्यसंस्कृती कुबेर यांनी आपल्या लेखणीतून प्रभावीपणे उलगडली आहे.

लिखित माध्यमाची ताकद जबरदस्त
इलेक्ट्रॉनिक माध्यमे कितीही वाढली तरी लिखित माध्यमाची ताकद जबरदस्त आहे. व्यवस्थेच्या विरुद्ध राहून त्रुटी दाखविणे ही पत्रकारितेची जबाबदारी आहे. पण, आमचेच लोक राज्यसभा खासदार होत आहेत, असे सांगून गिरीश कुबेर म्हणाले, बांधिलकी वाचकांशी असायला हवी. आता आधुनिक माध्यमांमुळे त्याला माहिती मिळते. त्यामागची माहिती देत वाचकाला सजग करणे हे आमचे काम आहे. भावनिकता बाजूला ठेवून बुद्धीच्या आधारे विचार करीत प्रश्न विचारले पाहिजेत.