भारतीयांमध्ये काहीही करून दाखविण्याची क्षमता आहे. त्यामुळे सकारात्मक विचार व त्या दृष्टीने आचार केल्यास आपण स्वप्नातला वैभवी भारत निश्चितच साकारू शकतो, असे विचार ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले.
माशेलकर यांनी लिहिलेल्या ‘रिइनव्हेंटिंग इंडिया’ ग्रंथाच्या ‘शोध- नव्या भारताचा’ या अनुवादाचे प्रकाशन शनिवारी ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. ‘सह्य़ाद्री प्रकाशन’च्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला माजी सनदी अधिकारी, लेखक अविनाश धर्माधिकारी, ज्येष्ठ अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. के. एच. संचेती, ‘जडण- घडण’चे मुख्य संपादक डॉ. सागर देशपांडे, सह्य़ाद्री प्रकाशनच्या संचालिका व पुस्तकाच्या अनुवादक स्मिता देशपांडे आदी उपस्थित होते.
माशेलकर म्हणाले,‘‘विचारांचे रुपांतर आचारात करण्याची गरज आहे. आचार व विचार एकत्र आले, तर देश पुढे जाईल. आजच्या तरुण पिढीमध्ये जिज्ञासा आहे. त्यांना काही तरी करायचे आहे, पुढे जायचे आहे. त्यांना चालना देणे ही आपली जबाबदारी आहे. आपण अशक्य ते शक्य करू शकतो. त्यासाठी सकारात्मक विचार करण्याची सवय लावली पाहिजे.’’
भटकर म्हणाले,‘‘माशेलकरांनी पुस्तकातून मांडलेले विचार नव्या पिढीसाठी महत्त्वाचे आहेत. प्रचंड विरोधाभास असलेल्या समाजात सरकार किंवा कोण काय करते याचा विचार न करता, देशासाठी मी काय करू शकतो, हा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. असा विचार माशेलकरांनी त्यांच्या कार्यातून प्रत्यक्षात आणला. अशक्यप्राय गोष्टी त्यांनी प्रत्यक्षात आणल्या. त्यांनी समाजाला नवी दृष्टी दिली.’’
धर्माधिकारी म्हणाले,‘‘ माशेलकर यांचे पुस्तक बदलत्या भारताची प्रतिमा आहे. भारतात अांतरिक शक्ती आहे, ती ओळखली तर आपण जगात काहीही करू शकतो. बुद्धिमत्तेबरोबरच नैसर्गिक साधन-संपत्ती आपल्याकडे आहे. त्या जोरावर आपण सर्वकाही साध्य करू शकतो, हा विश्वास निर्माण झाला पाहिजे.’’
 
‘ गुजरातपेक्षा जर्मनीच्या पुढे जाण्याचा विचार व्हावा ‘

महाराष्ट्राचा आकार व जर्मनीचा आकार सारखाच आहे. पण, जर्मनी राज्यापेक्षा खूप पुढे आहे. प्रगतीच्या बाबतीत गुजरातशी तुलना करण्यापेक्षा जर्मनीशी करावी व गुजरातपेक्षा जर्मनीच्या पुढे कसे जाता येईल, याचा विचार नेत्यांनी करावा, असा टोला डॉ. विजय भटकर यांनी लगावला. आपल्या संस्कृतीत उच्चकोटीची ज्ञानप्रणाली असल्याने भारत निश्चितच चीनलाही मागे टाकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.