साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष राजेंद्र बनहट्टी यांचे मत

लेखकांना प्रकाशात आणण्याचे काम प्रकाशक करतात आणि ते मात्र अंधारातच राहतात. लेखकांइतकीच पुस्तक निर्मितीत प्रकाशकांची भूमिका महत्त्वाची आहे. म्हणूनच प्रकाशकांनाही प्रकाशात आणणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा अखिल भारतीय मराठी संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक राजेंद्र बनहट्टी यांनी व्यक्त केली.

सुविचार, प्रकाशन आणि मसाप यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा उत्कृष्ट निर्मिती मूल्यासाठीचा पुरस्कार काव्यदीप प्रकशनाच्या कवी राम कुतवळ लिखित ‘जगता जगता’ या कविता संग्रहाला प्रदान करण्यात आला. या वेळी बनहट्टी बोलत होते. काव्यदीप प्रकाशनाच्या वतीने प्रदीप आणि अनिता निफाडकर यांनी पुरस्कार स्वीकारला. रोख पाच हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

पुस्तक निर्मितीमध्ये, संपादक, मुद्रक, मुद्रितशोधक, बांधणी आणि मांडणी करणारे, चित्रकार या सगळ्यांचे योगदान असते. प्रकाशक हा कुशल संयोजक असतो, असे बनहट्टी यांनी या वेळी सांगितले. प्रा. मििलद जोशी म्हणाले, ‘पुस्तक निर्मिती ही सर्जनाची सांघिक प्रक्रिया आहे. त्यात सर्वच घटकांचे योगदान मोलाचे आहे. तरीही अनेकदा त्याचे श्रेय सर्व घटकांना मिळत नाही. अनेकदा उत्तम निर्मिती मूल्य असणारी पुस्तके प्रकाशित होतात; पण त्यात आशय नसतो. अशावेळी निर्मितीमागचे मूल्य कोणाचे हा प्रश्न उपस्थित होतो.’