मानाच्या पाचही गणपती मंडळांची विसर्जन मिरवणूक वेळेत पार पडावी याकरीता आम्ही नियोजन केले आहे. त्यानुसार, रविवारी सकाळी साडेदहा वाजता पालकमंत्री, महापौर आणि पोलीस आयुक्तांच्या हस्ते गणरायाचे पूजन होईल. त्यानंतर प्रत्येक मानाचा गणपती १५ मिनिटांच्या अंतराने एकामागून एक निघतील. तसेच गतवर्षापेक्षा यंदा कमी वेळेत विसर्जन मिरवणूक संपवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही या मानाच्या पाच मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मानाचा दुसरा गणपती असलेल्या तांबडी जोगेश्वरी मंडळाच्या उत्सव मंडपात आयोजित पत्रकार परिषदेला कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, तांबडी जोगेश्वरी मंडळाचे राजाभाऊ टिकार, सौरभ धडफळे, गुरुजी तालीम मंडळाचे पृथ्वीराज परदेशी, तुळशीबाग मंडळाचे विवेक खटावकर यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी श्रीकांत शेटे म्हणाले, मंडईतील टिळक पुतळ्यापासून ते बेलबाग चौकापर्यंत मानाच्या गणपती मंडळांना येण्याकरीता जो वेळ लागतो, तो यंदा कमी करण्याकरीता प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याकरीता ढोल-ताशा पथके लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिराच्या बाजूला सज्ज राहणार असून तेथून बेलबाग चौकातच ती पथके मिरवणुकीत सहभागी होतील. यामुळे मंडई ते बेलबाग चौकादरम्यान लागणारा जादा वेळ कमी होणार आहे. एका पथकात ४० ढोल, १५ ताशे, १० ध्वजधारी आणि १० जादा वादक असा ताफा असणार आहे. वादकांची संख्या मर्यादित करण्यात आल्याने वेळेतमध्ये फरक पडेल.

तसेच बेलबाग चौकापासून मुख्य ढोल-ताशा पथके मिरवणुकीत सहभागी होतील, असे नियोजन केले असून गणेशोत्सवाचा सर्वोच्च क्षण आणि मानबिंदू असलेला विसर्जन सोहळा वेळेत पार पाडण्याकरीता प्रशासन आणि पोलिसांनीही सहकार्य करावे असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune attempts to end the procession of main ganapati this time in less time
First published on: 21-09-2018 at 23:09 IST