बालेवाडीतील पार्क एक्सप्रेस गृहप्रकल्पातील इमारतीच्या तेराव्या मजल्याचा स्लॅब कोसळून ९ मजूर ठार झाल्याची घटना शुक्रवारी (२९ जुलै) घडली. या दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांविरुद्ध गुन्हा दाखल होऊन सहा दिवस उलटले असले, तरी अद्याप त्यांचा शोध लागलेला नाही. त्यांचा शोध राज्यातील विविध भागात घेण्यात आला. मात्र, अद्याप काहीच ठावठिकाणा लागलेला नाही.

बालेवाडी दुर्घटनेनंतर पोलिसांनी बांधकाम व्यावसायिकांसह दहा जणांविरुद्ध महाराष्ट्र सदानिका मालकी हक्क कायदा (मोफा), सदोष मनुष्यवध तसेच नगररचना अधिनियमनअंतर्गत गुन्हा दाखल केला. शुक्रवारी (२९ जुलै) रात्री गुन्हा दाखल झाल्यानंतर मुख्य आरोपी असलेले बांधकाम व्यावसायिक पसार झाले आहेत. अद्याप त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. या संदर्भात परिमंडल तीनचे पोलीस उपायुक्त बसवराज तेली म्हणाले, की बालेवाडी दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. उर्वरित आरोपी पसार आहेत. त्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांची चार ते पाच पथके  तयार करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील विविध शहरांत आरोपींचा शोध घेण्यात आला. मात्र, त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. पोलिसांचे पथक त्यांच्या घरीही जाऊन आले. मात्र, तेथे आरोपींचे नातेवाईक देखील उपस्थित नव्हते. त्यामुळे पोलिसांना फारशी माहिती मिळू शकली नाही. पसार झालेल्या आरोपींनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केले आहेत.

या प्रक रणी भाविन हर्षद शहा, ज्ञानेश्वर लक्ष्मण चव्हाण, संतोष सोपान चव्हाण, श्रीकांत किसन पवार यांना अटक करण्यात आली. पार्क  एक्सप्रेस गृहप्रकल्पाच्या दुर्घटनेस जबाबदार असणारे श्रीनिवास डेव्हलपर्स व प्राईड पर्पल प्रॉपर्टीजचे अरविंद जैन, समर्थ ग्रुपचे श्रवण अगरवाल, अभिनव ग्रुपचे कैलास वाणी, श्याम शेंडे यांच्यासह महेंद्र चव्हाण, भाविन शहा, संतोष चव्हाण, ज्ञानेश्वर चव्हाण, प्रदीप कुसुमकर यांच्याविरुद्ध शुक्रवारी (२९ जुलै) रात्री चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, अद्याप त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही.