पोलिसांना पाहताच मुखपट्टीचा वापर

पुणे : शहरात करोनाचा संसर्ग वाढीस लागला असताना मुखपट्टी न वापरणारे मोकाट फिरत आहेत. मुखपट्टी न वापरणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. गेल्या चार दिवसात पोलिसांनी  मुखपट्टी न वापरणाऱ्यांकडून  पंचवीस लाखांहून जास्त दंड वसूल केला असला तरी आदेश धुडकावून मुखपट्टी न वापरणाऱ्यांचेही प्रमाण मोठे आहे.

करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने प्रशासन चिंतेत आहे. करोना संसर्गाला अटकाव करण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सार्वजनिक ठिकाणी मुखपट्टी वापरणे बंधनकारक केले आहे. करोनाच्या संसर्गात सुरुवातीला अनेक जण मुखपट्टी वापरत होते. करोनाचा संसर्ग वाढीस प्रशासनाने सार्वजनिक ठिकाणी मुखपट्टी न वापरणाऱ्यांवर  कारवाईचे आदेश पोलिसांना नुकतेच दिले. त्यानंतर पोलिसांनी गेल्या चार दिवसांपासून कारवाई पुन्हा तीव्र केली आहे.  र्निबध शिथिल झाल्यानंतर शहरातील चहा विक्रीची छोटी दुकाने आणि पानपट्टय़ा सुरू करण्यात आल्या. या भागात थांबणारे अनेक जण मुखपट्टीचा वापर करत नसल्याचे आढळून आले आहे. सुरुवातीला पोलिसांनी मुखपट्टी न वापरणाऱ्यांवर कारवाई तीव्र केली होती. कारवाईच्या धसक्यामुळे अनेकांनी सार्वजनिक ठिकाणी मुखपट्टीचा वापर सुरू केला होता. मात्र, र्निबध शिथिल झाल्यानंतर खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. भाजी मंडई तसेच मध्यभागातील व्यापारी पेठेत काही जण मुखपट्टी वापरत नसल्याचे आढळून आले. गणेशोत्सवात करोना संसर्गाचे प्रमाण वाढीस लागलेले असतानाही भाविकांची गर्दी झाली होती.

नागरिकांची बेफिकिरी

मुखपट्टी न वापरणारे अनेक जण शहरातील पानपट्टी, चहा विक्रीच्या दुकानांपुढे थांबत आहेत. या भागात काही टोळकीही थांबलेली असतात. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करत थांबलेल्या टोळक्यांवर कारवाई देखील होत नाही. तेथेच पान, गुटख्याच्या पिचकाऱ्या मारल्या जातात. दुचाकीस्वार देखील बऱ्याचदा मुखपट्टीचा वापर करत नाहीत. नागरिकांच्या बेफिकिरीमुळे करोनाचा संसर्ग वाढत आहे.

पोलिसांना पाहताच मुखपट्टी

गेल्या चार दिवसांपासून पोलिसांनी बंदोबस्त वाढविला आहे. पोलिसांना पाहताच काही वाहनचालक मुखपट्टी लावत आहेत.सिग्नलला थांबलेल्या मुखपट्टी न वापरणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात येते. गेल्या काही दिवसांपासून वाहतूक नियमभंगाचे प्रमाण वाढीस लागल्याचे दिसून येत आहे.