सात ठिकाणी घरफोडी

शहरात घरफोडीचे सत्र सुरू आहे. वेगवेगळ्या भागात चोरटय़ांनी सात घरफोडय़ा केल्याचे उघडकीस आले आहे. भारती विद्यापीठ, चंदननगर, भारती विद्यापीठ, भोसरी, खडकी, वारजे, भवानी पेठ भागात घरफोडय़ा करून चोरटय़ांनी लाखो रुपयांचा ऐवज लांबविला.

दिवाळीच्या सुट्टीमुळे अनेक जण बाहेरगावी गेले आहेत. चोरटय़ांनी विविध सोसायटय़ांमधील बंद सदनिकांवर पाळत ठेवून कुलूप तोडले आणि ऐवज लांबविला. गेल्या दोन दिवसांत सात ठिकाणी घरफोडय़ा झाल्या. भारती विद्यापीठ भागातील दीनदयाळनगर सोसायटीत राहणारे कृष्णराव ढेरे (वय ६८) यांच्या सदनिकेचे कुलूप तोडून चोरटय़ांनी ६६ हजारांचे दागिने लांबविल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. आंबेगाव भागातील श्रीनाथ लेक व्हय़ू सोसायटीतील सुधाहरी नलावडे (वय ३६) यांच्या सदनिकेचे कुलूप तोडून चोरटय़ांनी ३१ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि रोकड चोरटय़ांनी लांबविली. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  भोसरीतील जनाई हाइट्स इमारतीत असलेल्या चष्म्यांच्या दुकानाचा दरवाजा उचकटून चोरटय़ांनी यंत्र लांबविले. खडकी भागात प्रकाश साळुंके (वय ५८) यांच्या सदनिकेचे कुलूप तोडून चोरटय़ांनी ऐवज लांबविल्याची घटना उघडकीस आली. वारजे भागात एका सदनिकेचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून चोरटय़ांनी लॅपटॉप लांबविल्याची तक्रार जनार्दन इंगळे यांनी पोलिसांकडे दिली. भवानी पेठेतील कासेवाडी भागात कविता रासगे यांच्या घरातून ४७ हजार दोनशे रुपयांचा ऐवज चोरटय़ांनी लांबविला. या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.