किमान तापमानात ९ ते १८ अंशांपर्यंतचा चढ-उतार; दुपारी उकाडा आणि पहाटे थंडी

वातावरणात सातत्याने होणाऱ्या बदलांमुळे यंदा थंडीतील चढ-उतार सातत्याने कायम राहिला असून, जानेवारी महिन्यामध्ये पुणेकरांना थंडीची नानारुपे अनुभवण्यास मिळाली असल्याचे दिसून येते. याच महिन्यामध्ये सलग तीन ते चार वेळा किमान तापमानामध्ये मोठय़ा प्रमाणावर चढ-उतार अनुभवण्यास मिळाला. जानेवारीच्या मध्यावर थेट १८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलेले तापमान शेवटच्या आठवडय़ात ९ ते १० अंशांपर्यंत खाली आले होते. त्यामुळे दुपारी उकाडा आणि पहाटे थंडी अशी स्थितीही काही दिवस शहरात निर्माण झाली होती.

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या तीव्रतेनुसार राज्याच्या विविध भागासह पुणे आणि परिसरातील किमान तापमानावर परिणाम होत असतो. पुणे वेधशाळा आणि हवामान विभागाने नोंदविलेली आकडेवारी पाहता पुणे आणि परिसरातील थंडीच्या वातावरणामध्ये सातत्याने बदल झालेले दिसून येतात. थंडीला सुरुवात झाल्यानंतर काही कालावधीतच ओखी वादळाच्या परिणामाने शहरात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने थंडी गायब झाली. त्यानंतर डिसेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात पुन्हा थंडीने जोम धरला. याच कालावधीत शहरातील यंदाचे नीचांकी ८.४ तापमानाची नोंद झाली.

डिसेंबरनंतर जानेवारीच्या पहिल्या तारखेपर्यंत थंडी कायम होती. त्यानंतर ४ जानेवारीला किमान तापमानात पुन्हा वाढ होत ते १२ अंशांच्या पुढे गेले. त्यानंतर चारच दिवसांमध्ये ते १० अंशांवर आले. एक-दोन दिवस पारा कायम राहिला. पहाटे आणि रात्री काहीशी थंडी जाणवत असतानाच ११ जानेवारीपासून किमान तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली. १२ जानेवारीला १५.५ अंशांवरून १७ जानेवारीला किमान तापमान थेट १८ अंशांच्या आसपास पोहोचले. त्यामुळे शहरातून थंडी जवळपास गायब झाली होती. अगदी उन्हाळ्याप्रमाणे दुपारी उकाडा जाणवू लागला होता. समुद्रात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा आणि ढगाळ वातावरणामुळे ही स्थिती निर्माण झाली होती.

शहरातून आता थंडी गेली अशी स्थिती असताना २० जानेवारीपासून पारा काहीसा कमी होत पुन्हा थंडी अवतरली. २२ ते २४ जानेवारीपर्यंत किमान तापमानाचा पारा १० ते ११ अंशांवर कायम राहिला. त्यानंतर वातावरणाने पुन्हा कलाटणी घेतली. २५ जानेवारीपासून हिमालयात मोठय़ा प्रमाणावर हिमवृष्टी सुरू झाली. त्यामुळे उत्तरेकडून थंड वारे राज्याच्या दिशेने वाहू लागले. परिणामी शहराच्या तापमानातही घट होऊन ते दहा अंशांच्या खाली घसरले. जानेवारीच्या शेवटच्या दिवशी ३१ तारखेला किमान तापमान ९.६ अंशांवर आले होते. फेब्रुवारीच्या पहिल्या दिवशी गुरुवारी शहर आणि परिसरात किमान तापमान ९.२ अंशांवर होते.