दिवाळीची ओळख असलेले फटाके वाजवण्यात पुणेकर या वर्षी खूपच मागे राहिले असून, शहरात फटाक्यांच्या विक्रीतही कमालीची घट झाली आहे. त्यामुळे पुणेकरांची ध्वनिप्रदूषण आणि हवेच्या प्रदूषणापासून काही प्रमाणात सुटका झाली आहे. पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याची पद्धत, वाढलेली महागाई आणि मंदी या कारणांमुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांपासून फटाक्यांच्या विक्रीत सातत्याने घट होत असल्याचेही पाहायला मिळाले आहे.
दिवाळीच्या काळात पुण्यात आवाज आणि धुराचे भयंकर प्रदूषण होते. आवाजाचे आणि धूर करणारे फटाके हे त्याचे प्रमुख कारण असते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तर त्यात कमालीची वाढ होते. त्याचे दृश्य आणि अदृश्य असे अनेक घातक परिणामही होतात. या वेळी मात्र पुण्यात फटाके वाजवण्याचे प्रमाण कमी झाल्याचे पाहायला मिळाले. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फटाके वाजले खरे, पण त्याचे प्रमाण नेहमीच्या तुलनेत कमी होते. धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी आणि पाडव्याच्या दिवशी तर तुलनेने खूपच कमी प्रमाणात फटाके वाजल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे पुणेकरांना काही प्रमाणात मोकळा श्वास घेणे शक्य झाले.
फटाक्यांची विक्री कमी झाली असल्याचा सर्वच फटाका विक्रेत्यांचा अनुभव आहे. म्हात्रे पुलाजवळ फटाक्याची विक्री करणारे व या व्यवसायात अकरा वर्षे असलेले प्रशांत दिवेकर यांनी सांगितले की, यंदा फटाका स्टॉलवर ग्राहकांची गर्दी दिसलीच नाही. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत ६०-७० टक्के इतकीच विक्री झाली. त्यामुळे सर्वच विक्रेत्यांकडे मोठय़ा प्रमाणात फटाके शिल्लक राहिले. दरवर्षी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दुपापर्यंत सर्व फटाक्यांची विक्री व्हायची. अगदीच नाममात्र प्रमाणात फटाके शिल्लक असायचे. या वेळी मात्र म्हात्रे पुलावर सर्वच व्यापाऱ्यांचा निम्म्याहून अधिक माल शिल्लक राहिला. नरक चतुर्दशी आणि पाडव्याला तर जवळजवळ फटाके वाजलेच नाहीत.
या व्यवसायातील ज्येष्ठ व्यापारी संजय शिरसाळकर यांचाही असाच अनुभव आहे. ते गेल्या ५० वर्षांपासून या व्यवसायात आहेत. पुण्यात फटाक्यांच्या विक्रीत सातत्याने घट होत आहे. २०११ साली दिवाळीत फटाक्यांची जेवढी विक्री झाली, त्या तुलनेत केवळ ६५ टक्के विक्री २०१२ साली म्हणजे गेल्या वर्षी झाली. यंदाही त्याहीपेक्षा कितीतरी कमी विक्री झाली. २०११ सालाशी तुलना केली तर या वर्षी केवळ २५ ते ३० टक्के इतकीच फटाक्यांची विक्री झाली. संपूर्ण पुण्यात  २०११ साली दिवाळीच्या काळात तब्बल आठ ते दहा कोटी रुपयांचे फटाके विकले गेले होते. त्यावरून आता त्यात किती घट झाली आहे हे लक्षात येईल, असेही शिरसाळकर यांनी सांगितले.

फटाके कमी वाजण्याची कारणे-
१. पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याकडे मुलांचा कल
२. फटाके न वाजवण्याबाबत मुलांनी शाळेत घेतलेल्या शपथा
३. विविध कारणांमुळे फटाक्यांच्या किमतीत २५-३० टक्के वाढ
४. रस्त्यांवर स्टॉलला परवानगी नाकारल्याने स्टॉल्सची संख्या कमी
५. सध्या सुरू असलेल्या आर्थिक मंदीचा फटका

फटाका स्टॉल्सवर गर्दीच नाही
फटाके खरेदी करणाऱ्या ग्राहकांची गर्दी अगदीच नाममात्र कशी होती, याचे निरीक्षण फटाका व्यापारी शिरसाळकर यांनी नोंदवले. पुण्यात दिवाळीमध्ये म्हात्रे पुलाजवळ फटाका विक्रीच्या स्टॉल्सना परवानगी असते. तिथे सर्वाधिक विक्री होते. दिवाळीच्या तीन दिवसांमध्ये तिथे मोठय़ा प्रमाणात वाहतुकीची कोंडी होते. मोटारसायकल घेऊन जाणेही जिकिरीचे असायचे. यावर्षी रस्ता मोकळा होता. अगदी बस आणि ट्रकसुद्धा या रस्त्यावरून विनाअडथळा जाऊ शकत होते, असे त्यांनी सांगितले.