पुण्यातील जम्बो कोविड रुग्णालयातील करोनाबाधितांना आता आहार तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार पाचवेळा उत्कृष्ट दर्जाचे जेवण देण्यात येणार आहे. शिवाय, व्हिडिओद्वारे त्यांना आपल्या नातेवाईकांशी संवाद देखील साधता येणार आहे. अशी माहिती अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली आहे.

पुण्यातील शिवाजीनगर येथील सीईओपी महाविद्यालयाच्या मैदानावरील जम्बो कोविड रूग्णालयामधील रुग्णांना उपचारांबरोबरच चांगला आहार दिला जावा, त्यांच्या सुरक्षेची काळजी घेतली जावी. तसेच उपचार घेणार्‍या रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णांशी व्हिडिओद्वारे संवाद साधण्याची व्यवस्था करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. त्या आदेशानुसार यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. अशी माहिती अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली असून, आतापर्यंत १५ रुग्ण करोनावर मात करून घरी गेले असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

पुणे शहरात करोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता. शिवाजीनगर येथील सीईओपी महाविद्यालयाच्या मैदानावर जम्बो रूग्णालय उभारण्यात आले. मात्र पहिल्याच दिवसापासून प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे रुग्णांना नाहक त्रासाला, तर पत्रकार पांडुरंग रायकर यांना मृत्यूला सामोरे जावे लागले. त्यानंतर प्रशासनाच्या कारभारावर चहुबाजूने टीका होऊ लागली.

या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रुग्णांना चांगले उपचार द्या, नातेवाईकांना रुग्णांची माहिती मिळण्याच्या दृष्टीने गेट बाहेर सीसीटीव्हीसह व्हिडिओची व्यवस्था करा, असे निर्देश दिले होते. त्यानुसार महापालिका प्रशासना मार्फत तयारी करण्यात आली आहे.

अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल म्हणाल्या की, रूग्णालयात उपचार घेणार्‍या रुग्णांची माहिती त्यांच्या कुटुंबियांना दिवसातून तीनवेळा मिळणार आहे. यासाठी दिवसातून एकदा एका नातेवाईकास रुग्णाशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद देखील साधता येणार आहे. तसेच, टॅबची व्यवस्था महापालिकेने केली असून आरोग्य कर्मचारी रुग्णाजवळ जाऊन हेल्पडेस्क येथील नातेवाईकाशी व्हिडिओ कॉल जोडून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.