मुंबई शेअर बाजारात घंटानादचाही मान

मुंबई शेअर बाजाराची घंटा नेहमीसारखीच सकाळी साडेनऊ वाजता वाजली आणि उलाढाली सुरू झाल्या. मात्र आज सुरुवात करण्याचा इशारा देणारी घंटा खास होती. आज हा मान मिळाला होता तो बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाची (बीएमसीसी) विद्यार्थिनी असलेल्या कोमल राऊत हिला. आंतरराष्ट्रीय कन्या दिनानिमित्त एक दिवस कॅनडाची दूत म्हणून काम करण्याचा आणि मुंबई शेअर बाजाराची घंटा देण्याचा मान कोमल हिला सोमवारी देण्यात आला.

आंतरराष्ट्रीय कन्या दिन ११ ऑक्टोबरला साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने पुण्यातील बीएमसीसी महाविद्यालयात शिकणाऱ्या कोमलला कॅनडाची दूत म्हणून काम करण्याची संधी देण्यात आली. कॅनडाचा दूतावास आणि राज्यातील स्वयंसेवी संस्थाकडून मुलींचे शिक्षण, विकास यासाठी काही प्रकल्प राबवतात. कन्या दिनाच्या निमित्ताने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर पुढे गेलेल्या, मुलींचे प्रश्न समजून ते मांडू शकणाऱ्या एखाद्या मुलीला एक दिवस कॅनडाची दूत म्हणून काम करण्याची संधी देण्याची योजना आखण्यात आली होती. महानगरपालिकेच्या शाळेतून शालेय शिक्षण पूर्ण केलेली कोमल ही आकांक्षा फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेशी जोडली गेली आहे. विविध उपक्रम, स्पर्धा यांतून चमकणाऱ्या कोमलला हा मान देण्यात आला.

प्रथम वर्ष वाणिज्य शाखेच्या वर्गात शिकणारी कोमल लेखापाल (सीए) परीक्षेचा अभ्यासही करत आहे. के सी. ठाकरे विद्यानिकेतन शाळेतून तिने दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. वक्तृत्व, वादविवाद, निबंध, व्हॉलिबॉल अशा स्पर्धामधून तिने प्रावीण्य मिळवले आहे. एक दिवस काम करण्याच्या अनुभवाबाबत कोमल हिने सांगितले, ‘मुंबई शेअर बाजाराची घंटा वाजवणे हा अविस्मरणीय अनुभव होता. आतापर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रातल्या दिग्गजांना ही संधी मिळाली आहे. त्याचबरोबर दिवसभर कॅनडाची दूत म्हणून काम करताना अनेक नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. आम्ही मुंबईतील मनपाच्या शाळेत भेट दिली, प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली. दूतावासातील बैठकीला उपस्थित राहिलो. या सगळ्यातून चांगले काहीतरी करण्याची ऊर्जा मिळाली आहे.’