पुण्यात पुन्हा एकदा २३ जुलैच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत कडकडीत ‘लॉकडाउन’ला सुरूवात झाली आहे. अशात लॉकडाउनमध्ये ई-पास आणि वैद्यकीय प्रमाणपत्र बनवून देण्याची जाहिरात सोशल मीडियावर देणाऱ्या एका आरोपीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे.

महेश वाघमारे (वय- २७) असं आरोपीचं नाव असून तो मगरपट्टा, हडपसरचा रहिवासी आहे. हिंदुस्थान टाइम्सच्या वृत्तानुसार, “कॅब सेवा पुण्यात आणि पुण्याबाहेरही सुरू आहे. आम्ही ई-पासही उपलब्ध करुन देतो”, अशाप्रकारची एक पोस्ट आरोपीने सोशल मीडियावर अपलोड केली होती. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला सापळा रचून अटक केली. एका पोलीस अधिकाऱ्याने त्याच्याशी ग्राहक बनून संपर्क साधला आणि पुण्याहून नाशिकला जाण्याची विचारणा केली. त्यावर वाघमारेने ई-पाससाठी 2,000/- रुपये, मेडिलक प्रमाणपत्रासाठी 500/- रुपये असे एकूण 2,500/-रुपये खर्च येईल, असं सांगितलं. आधी 1,500/-रुपये व पास मंजूर झाल्यावर 1,000/-रुपये द्यावे लागतील, असंही आरोपीनं सांगितलं. त्यानंतर आधार कार्डचा फोटो सेंड करण्यास सांगितलं. आधार कार्डचा फोटो सेंड केल्यानंतर आरोपीने तो फोटो वापरुन वैद्यकीय प्रमाणपत्र बनवून दिलं.

दरम्यान, पोलिसांनी आरोपीविरोधात भादंवि कलम 420, 465, 188 नुसार गुन्हा दाखल केला आहे. तो दोन दिवसांपासून पोलिस कोठडीत असून त्याने यापूर्वी कोणाकडून पैसे उकळले आहेत का याबाबत तपास सुरू आहे, अशी माहिती हडपसर पोलिसांनी दिली.