मुंबई येथे मंत्रालयाच्या परिसरात कामानिमित्त जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी आता पुणे ते मंत्रालय मार्गावर सेवा देण्याचा निर्णय राज्य परिवहन महामंडळाने घेतला आहे. एसटीच्या वातानुकूलित शिवनेरी सेवेच्या १ सप्टेंबरपासून या मार्गावर दररोज दोन फेऱ्या सोडण्यात येणार आहेत.
पुणे स्टेशन एसटी स्थानकावरून दररोज सकाळी सहा व दुपारी दोन वाजता पुणे- मंत्रालय ही शिवनेरी गाडी सोडण्यात येणार आहे. औंध, िहजवडी, वाकड, द्रुतगती मार्ग, कोकणभवन, नेरुळ फाटा, वाशी महामार्ग, मैत्री पार्क, दादर, छत्रपती शिवाजी टर्मिनस या मार्गाने जाऊन ही गाडी सकाळी पावणेदहा व संध्याकाळी पावणेसहा वाजता मंत्रालय येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात मंत्रालय येथून सकाळी दहा व संध्याकाळी सहा वाजता गाडी सोडण्यात येईल. या गाडय़ा अनुक्रमे दुपारी पावणेदोन व रात्री पावणेदहा वाजता पुणे स्थानकावर पोहोचतील.
पुणे ते मंत्रालय या १८० किलोमीटरच्या प्रवासासाठी शिवनेरी बससाठी ४५० रुपये (प्रौढांसाठी) प्रवासभाडे आकारण्यात येणार आहे. या गाडीचे आरक्षण महामंडळाच्या संकेतस्थळावर त्याचप्रमाणे सर्व आरक्षण केंद्रांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. या सेवेमुळे पुण्याहून मंत्रालयाच्या परिसरात त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे जाणाऱ्या प्रवाशांची उत्तम सोय होणार असल्याने प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.