शाळेत सायकल लावण्यासाठी भरमसाठ शुल्क, मुलींवर ठराविक रंगाच्या अंतर्वस्त्रांची सक्ती आणि गणवेश अधिकृत टेलरकडूनच घेणे अशा जाचक अटी लादणाऱ्या एमआयटीच्या कोथरुड येथील विश्वशांती गुरुकुल शाळेला पालकांसमोर अखेर नमते घ्यावे लागले आहे. शिक्षण विभागाने या प्रकरणाच्या चौकशी आदेश दिले असतानाच शाळा प्रशासनाने पालकांना लेखी निवेदन दिले आहे. ‘स्कूल डायरीत दिलेल्या सूचना या कोणाच्याही वैयक्तिक किंवा सामुहिक भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. शाळेच्या प्रशासनाकडून सदैव विद्यार्थी केंद्रीत विचार करुन संबंधित डायरी आणि सूचना मागे घेण्यात येत आहेत’, असे शाळा प्रशासनाने म्हटले आहे.

पुण्यातील माईर्स एमआयटीच्या विश्वशांती गुरुकुलमधील शुल्कवाढीविरोधात पालकांची कृती समिती आणि शाळा प्रशासनात वाद सुरु होता. शाळेकडून ३० जून रोजी स्कूल डायरी देण्यात आली होती. यात सायकल पार्किंगसाठी वार्षिक १५०० रुपये शुल्क आगावू भरले पाहिजे, तसेच मुलींनी पांढऱ्या किंवा स्कीन कलरचीच अंतर्वस्त्रे घालावीत, अशा जाचक अटी देखील यात होत्या. यावरुन वाद निर्माण झाला होता. शिक्षण विभागानेही या घटनेची दखल घेत विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. विधिमंडळात या घटनेचे पडसाद उमटत असतानाच शिवसेना,मनसे,भीम आर्मी आणि राष्ट्रवादी काँग्रेस या राजकीय संघटनांनीही दुपारी शाळेत आंदोलन केले. पालकांच्या या लढ्याला अखेर यश आले असून शाळा प्रशासनाने जाचक अटी मागे घेतल्याचे शाळेच्या संचालिका सुचित्रा कराड यांनी जाहीर केले.

सुचित्रा कराड म्हणाल्या की,शाळेतील विद्यार्थ्यांच्या दृष्टीने शाळा प्रशासनाने त्यांचा गणवेश आणि इतर निर्णय घेतले होते. पालकांची भूमिका लक्षात घेता आम्ही हा निर्णय मागे घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या पुढील काळात निर्णय घेताना पालकांना देखील विश्वासात घेतले जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.