घरी आल्यावर लगेचच न सांगता कोणी चहा जरी करून दिला तर मनाला होणारा आनंद काही निराळाच असतो. अनेकदा आपण हे पाहतो आणि यातून मिळणारे समाधानही आनंददायी असते. असंच पुणे महानगरपालिकेतील अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांच्या सात वर्षाच्या रिशिव मुलाने त्या कामावरून घरी आल्यावर मिकी माऊसच्या आकाराची चपाती करून दिली. सध्या हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसंच आईसाठी चपाती तयार करणार्‍या मुलावर कौतुकाचा वर्षावही होत आहे. “करोना काळातील अनेक अनुभव आले आहेत. ते आयुष्यभर कधीच न विसरणारे आहे आणि कालच मुलाने घरी आल्यावर चपाती करून माझ्यासमोर ठेवल्याने त्याकडे पाहून माझे डोळे अक्षरश: पाणावले होते. त्यामुळे मला आणखी काम करण्याची ऊर्जा मिळाल्याची भावना त्यांनी लोकसत्ता ऑनलाइनच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली.

“मम्मी तू घरी केव्हा येणार आहेस, तुझी खुप आठवण येत आहे. किती वेळ झाला अजून आली नाहीस. त्यावर मी म्हणते पाच मिनिटात येते बाळा. अनेकदा लवकर काम करून घरी जायचे असे ठरवते पण ते शक्य होत नाही. मागील काही महिन्यांपासून अनेकदा मुलासोबत बोलताना असे झाले आहे,” असंही रुबल अग्रवाल म्हणाल्या. पण सध्या करोनाच्या कामामुळे घरी येण्यास मुलाला सांगितलेल्या वेळेपेक्षा अधिक उशीर आजपर्यंत घरी जाण्यास झाला आहे. गेल्या काही महिन्यामध्ये कधी कधी तो माझी वाट पाहत झोपूनदेखील गेला आहे हे सांगताना त्यांचा कंठ दाटून आला होता.

“बुधवारी असंच कामावरून रात्री दहाच्या सुमारास घरी आले. तेव्हा रिशिव माझ्याजवळ येऊन, मम्मी तुला एक सरप्राईज देतो असं म्हणाला आणि त्याने माझ्या समोर एका प्लेटमध्ये मिकी माऊसच्या आकाराची चपाती आणून ठेवली. ते पाहून मी थक्कच झाले. त्यानंतर झालेल्या आनंदामुळे दिवसभर केलेल्या कामामुळे आलेला थकवा निघून गेला. चपाती करायची म्हटलं तर खुप प्रयत्न करावे लागतात. त्याला ती करण्यास कशी जमली, असा प्रश्न मलाही निर्माण झाला होता,” असंही त्या म्हणाल्या.

“मी याबाबत आमच्याकडे असलेल्या मावशींना विचारले. तेव्हा त्या म्हणाल्या की, मी स्वयंपाक करत होते. तेव्हा रिशिव माझ्याजवळ आला. मावशी आईला सरप्राईज द्यायच आहे. मी चपाती बनवतो. त्यावर त्याने चपाती तयार करण्यास सुरुवात केली. पण गोल काही होत नव्हती. त्यावेळी त्याने स्टील च्या डब्याने गोल केली आणि त्यानंतर मिकी माऊस सारखे पीठाने कान आणि स्माईली तयार करून चांगली भाजून तयार केली. मुले मोठी झाल्यावर आई बाबा कामावरून आल्यावर पाणी किंवा चहा देतात. आजचा दिवस कसा गेला असे विचारतात. पण एवढ्या लहान वयात आईसाठी चपाती केल्याने मला खुप आनंद झाला आहे,” अशी भावनाही रुबल अग्रवाल यांनी व्यक्त केली. हा क्षण कधीही विसरता येणार नसल्याचेही त्या म्हणाल्या.