२३ डिसेंबरपासून पुणे-नाशिक विमानसेवा

केंद्र शासनाच्या प्रादेशिक विमानसेवा योजना अर्थात ‘उडान’च्या अंतर्गत पुणे-नाशिक दरम्यानच्या विमानसेवेला मुहूर्त मिळाला असला, तरी ही दोन शहरे रेल्वेच्या नव्या मार्गाने जोडण्याचा विषय अद्यापही सर्वेक्षणाच्या पातळीवरच आहे. नियोजनानुसार २३ डिसेंबरपासून विमानसेवा सुरू करण्यात येणार असल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, रेल्वेमार्गाचाही विषय तातडीने मार्गी लावण्याची अपेक्षाही करण्यात येत आहे.

उडान योजनेअंतर्गत राज्यातील आणि देशातील विविध शहरांदरम्यान विमानसेवा सुरू करण्याची घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली. त्यात कोल्हापूर-मुंबई, नाशिक-मुंबई आणि नाशिक-पुणे या विमानसेवांचाही सहभाग आहे. पुणे-नाशिक दरम्यान एअर डेक्कन कंपनीकडून विमानसेवा देण्यात येणार आहे. या प्रवासासाठी ४० मिनिटांचा कालावधी लागणार असून, त्यासाठी सुमारे १४०० रुपयांपासून तिकीट आकारणी केली जाईल. पुणे-नाशिक प्रवासासाठी सध्या प्रामुख्याने रस्ते वाहतुकीचा वापर केला जातो. दोन्ही शहरांतून दररोज मोठय़ा संख्येने प्रवासी राज्य परिवहन महामंडळाच्या वातानुकूलित गाडय़ांनी प्रवास करतात. आता विमानसेवेचा वेगवान पर्यायही उपलब्ध होऊ शकणार असल्याने दोन्ही शहरांतील नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

विमानसेवेला सुरुवात होणार असल्याने मागील पंधरा वर्षांपासून रखडलेल्या पुणे-नाशिक नव्या रेल्वे मार्गाचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. लालूप्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना सर्वप्रथम या मार्गाच्या सर्वेक्षणाचा विषय रेल्वे अंदाजपत्रकात आला होता. ममता बॅनर्जी यांच्या काळातही या विषयाला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर २०११-१२ च्या रेल्वे अंदाजपत्रकातही हा विषय घेण्यात आला. पवनकुमार बन्सल रेल्वेमंत्री असताना रेल्वेच्या पुरवणी अंदाजपत्रकात पुणे-नाशिक या रेल्वे मार्गाची त्यांनी घोषणा केली होती. त्यानंतर या मार्गाच्या सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले होते.

सध्या रेल्वेने नाशिकला जाण्यासाठी कर्जत, पनवेल, कल्याणमार्गे जावे लागते. त्यामुळे प्रवासाचा वेळ वाढतो. त्यातून सध्याच्या रेल्वेसेवेला फारसा चांगला प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे प्रवाशांना रस्ते वाहतुकीशिवाय पर्याय उपलब्ध नसतो.