पुण्यातील सरस्वती मंदिर संस्थेचे पूना नाईट हायस्कूल आणि ज्युनिअर महाविद्यालयात दिवसा काम करून, रात्रीच्या वेळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी प्रवेश घेतात. या शाळेत आज इयत्ता आठवी ते इयत्ता दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्याच्या प्रथम सत्राची परीक्षा सुरू असताना रात्रीच्या सुमारास शाळेतील लाईट जाण्याची घटना घडली. त्यामुळे विद्यार्थ्यांना मेणबत्तीच्या उजेडात परीक्षा द्यावी लागली आहे.

पुणे शहरात मागील दोन दिवसापासून, मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे अनेक भागात झाड कोसळण्याच्या आणि लाईट जाण्याच्या घटना घडत आहे. आज देखील शहरातील अनेक भागात झाड कोसळण्याच्या आणि लाईट जाण्याच्या घटना घडल्या आहे. याचा फटका सरस्वती नाईट स्कूलमध्ये शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना बसला आहे.

या विषयी प्राचार्य अविनाश ताकवले म्हणाले की, इयत्ता आठवी ते इयत्ता दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची आज प्रथम सत्राची परीक्षा सुरू होती. त्या दरम्यान अचानक लाईट गेल्याने, तेथील विद्यार्थ्यांना मेणबत्तीच्या उजेडात परिक्षा द्यावी लागली असल्याचे त्यांनी सांगितले.