जगभरात करोनाबाधित रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे. आपल्या देशातदेखील करोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचं दिसत आहे. तर पुणे जिल्ह्यात आतापर्यंत एकून ३२ रुग्ण आढळले असून आज पुण्यात आणखी एका रुग्णाची त्यात भर पडली आहे.

पुणे जिल्ह्यात एकूण ३२ रुग्ण आज अखेर बाधित आढळले आहेत. त्यापैकी १० जणांचा १४ दिवसांचा विलगीकरणाचा कालावधी झाल्याने, त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आज पुण्यातील एका ५२ वर्षीय व्यक्तीला करोनाची बाधा झाल्याचे तपासणी मध्ये आढळून आले आहे. ती व्यक्ती कोणत्या व्यक्तीच्या संपर्कात आली होती या संदर्भात माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचं सांगण्यात आले आहे.

तर दुसरीकडे पिंपरी-चिंचवडमधील पाच करोना बाधितांची पहिली चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे सर्वांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. या सर्व रुग्णांवर भोसरी येथील नवीन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची १४ दिवसानंतर करण्यात आलेली पहिली चाचणी निगेटिव्ह आली असून त्यांची दुसरी चाचणी निगेटिव्ह आल्यास त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल अशी माहिती डॉ. लक्ष्मण गोफने यांनी दिली. दरम्यान, शुक्रवारी तीन करोनामुक्त तरुणांना घरी सोडण्यात आले होते.