पुणे पारपत्र (पासपोर्ट) कार्यालय लवकरच बाणेर येथील स्वत:च्या वास्तूत सुरू होणार असून पारपत्र कार्यालयाच्या नियोजित इमारतीचे भूमिपूजन परराष्ट्र मंत्रालयातील संयुक्त सचिव आणि मुख्य पारपत्र अधिकारी मुक्तेश कुमार परदेशी यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. पारपत्र कार्यालयाचे छोटे सेवा केंद्र लवकरच सोलापूर येथेही सुरू होणार आहे.
पुणे पारपत्र कार्यालयाला स्वत:ची जागा मिळण्याची प्रतीक्षा अनेक वर्षे होती. या कार्यालयाला आता जागा मिळाली असून लवकरच स्वत:ची वास्तू होणार आहे, असे परदेशी यांनी भूमिपूजन कार्यक्रमात सांगितले. पुणे कार्यालयाकडून दोन वर्षांत कामकाजात अनेक सुधारणा करण्यात आल्या असून एकूणच पारपत्र विभागात गेल्या पाच-सहा वर्षांत सकारात्मक बदल झाले आहेत असे ते म्हणाले. केंद्र सरकार ज्या गतीने नागरिकांना पारपत्र प्रदान करत आहे ते पाहता लवकरच चीन, अमेरिकेसारख्या देशांना आपण मागे टाकू, असेही ते म्हणाले. पारपत्र देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र हे महत्त्वपूर्ण राज्य आहे. मात्र येथे पोलीस तपासणी प्रक्रियेत विलंब होतो. या यंत्रणेत सुधारणा झाल्यास अधिक चांगली व गतिपूर्ण सेवा देता येईल, असेही परदेशी यांनी सांगितले.
पुणे पारपत्र कार्यालयाचे प्रमुख आणि भारतीय परराष्ट्र सेवेतील क्षेत्रीय पारपत्र अधिकारी अतुल गोतसुर्वे तसेच मुख्य अभियंता नरेंद्र कुमार यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. पुणे कार्यालय १९९९ पासून भाडे तत्त्वावरील कार्यालयात सुरू आहे. बाणेर येथील नवीन इमारतीची जागा १६ गुंठे असून येत्या १६ महिन्यात या ठिकाणी कार्यालय सुरू करण्याचे आव्हान अधिकाऱ्यांनी स्वीकारले आहे. या इमारतीसाठी १७ कोटी रुपये एवढा खर्च अपेक्षित असून इमारत जुलै २०१७ पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती गोतसुर्वे यांनी या वेळी दिली.