पिंपरी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे,पिंपरी-चिंचवड शहराची नवनिर्मिती केली. त्यामुळे दोन्ही शहरांना देशव्यापी ओळख मिळाली, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी गुरुवारी पिंपरीत सांगितले.

उपमुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त िपपरी-चिंचवड शहरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.पिंपरीगावातील भिकू वाघेरे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित नोकरी महोत्सवाचे उद्घाटन चाकणकर यांच्या हस्ते झाले, तेव्हा त्या बोलत होत्या. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार विलास लांडे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, हनुमंत गावडे, प्रशांत शितोळे, उषा वाघेरे आदी उपस्थित होते.

चाकणकर म्हणाल्या,की करोना संकटकाळात लाखो तरुणांचा रोजगार गेला. उद्योगधंदे ठप्प झाले. अनेक परिवारांपुढे आर्थिक समस्या निर्माण झाल्या. अशा तरुणांना पुन्हा उभारी देण्यासाठी नोकरीची आवश्यकता आहे. अशाप्रकारच्या नोकरी महोत्सवामुळे विस्कटलेली घरे सावरण्यासाठी हातभार लागणार आहे. आयोजक वाघेरे म्हणाले की, या नोकरी महोत्सवात तीन हजार तरुणांनी सहभाग घेतला. अधिकाधिक तरुणांना नोकरी मिळावी, यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संजय मेस्त्री, दीपक साकोरे यांनी केले. प्रशांत शितोळे यांनी आभार मानले. दरम्यान, पार्थ पवार फाउंडेशनच्या वतीने दापोडीत ज्येष्ठ नागरिकांसह स्वच्छतेचे काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. नगरसेवक राजू बनसोडे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.