पुण्यात काल (बुधवार) झालेल्या मुसळधार पावासामुळे टिळक रोडवर बसवर झाड कोसळल्याने घडलेल्या दुर्घटनेत बस चालक विजय नवघणे यांचा मृत्युमुखी झाला होता. यानंतर आज त्यांच्या नातेवाइकांनी अंत्यसंस्कारापूर्वी पीएमपीएमएल कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर रुग्णवाहिकेद्वारे विजय यांचा मृतदेह आणला होता. प्रशासनाच्या गलथान कारभारामुळेच त्यांचा मृत्यू झाला आहे, असा यावेळी नातेवाईकांकडून आरोप केला गेला. यावर त्यांचे म्हणने ऐकल्यानंतर मृत्यूमुखी पडलेले बस चालक विजय नवघणे यांच्या मुलास अनुकंपा तत्त्वावर कामावर घेतले जाईल व प्रशासन कुटुंबाच्या कायम पाठिशी राहिली, असे आश्वासन देण्यात आल्यानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला.

पुणे शहरात काल जोरदार पाऊस झाला. या दरम्यान टिळक रोडवर महाकाय झाड पीएमपीच्या बसवर कोसळले होते. या दुर्घटनेत बस चालक विजय नवघणे हे बसमध्येच अडकल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. त्यानंतर आज मृत त्यांच्या नातेवाइकांनी स्वारगेट येथील पीएमपीएमएल कार्यालयाच्या प्रवेशद्वारवर रुग्णवाहिकेमधून विजय यांचा मृतदेह आणत, यासाठी प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप केला होता.

पीएमपीएमएलच्या अध्यक्षा आणि संचालिका नयना गुंडे यांनी नातेवाईकांचे गाऱ्हाणे ऐकून घेतले. तसेच, विजय नवघणे यांच्या मुलास अनुकंपा तत्त्वावर कामावर घेण्यात येईल, असे आश्वासन देत, दोन लाख रूपयांची मदत देखील जाहीर केली. याशिवाय दीनदयाळ अपघात विमा योजनेतून देखील नवघणे कुटुंबास मदत दिली जाणार आहे. या सर्वांचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवली जाणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. त्यानंतर नातेवाइकांनी विजय नवघणे यांचा मृतदेह धनकवडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी नेला.