दुपारनंतर दुकाने बंद; पोलिसांच्या कारवाईमुळे नागरिकांमध्ये पुन्हा गोंधळ

पुणे : टाळेबंदीमुळे गेल्या दीड महिन्यांपासून जीवनावश्यक वस्तू, किराणा माल वगळता अन्य दुकाने बंद असल्याने नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी प्रतिबंधित क्षेत्र वगळता शहराच्या अन्य भागातील दुकाने सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळेत खुली ठेवण्याची मुभा दिल्यानंतर गुरुवारी (७ मे) किराणा माल, किरकोळ साहित्य, दूध डेअरी अशी दुकाने दुपापर्यंत खुली राहिली. मात्र, महापालिका आयुक्तांनी दिलेला आदेश धाब्यावर बसवून पोलिसांनी दुपारनंतर दुकाने बंद करण्यास सांगितल्याने पुन्हा गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.

महापालिका आयुक्तांनी आदेश दिल्यानंतर दुकाने सायंकाळी सातपर्यंत खुली ठेवण्यासाठी योग्य ते सहकार्य करण्यात  येईल, असे आश्वासन पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी दिले होते. मात्र, प्रत्यक्षात दुपारनंतर पोलिसांनी शहराच्या वेगवेगळ्या भागातील दुकाने बंद करण्यास सांगितले.

महापालिका आयुक्तांनी दुकाने खुली ठेवण्याची मुभा दिल्यानंतर गुरुवारी सकाळी जीवनावश्यक वस्तू, किराणा माल, दूध डेअरी, गॅरेज, इस्त्री तसेच किरकोळ साहित्याची (जनरल स्टोअर्स) विक्री करणारी दुकाने खुली ठेवण्यात आली.

शहराच्या मध्य भागातील किराणा माल विक्री, गॅरेज, किरकोळ साहित्याची विक्री करणारी दुकाने सकाळी उघडण्यात आली. सहकारनगर, कर्वेनगर, वारजे, सिंहगड रस्ता, कोथरूड, बाणेर, औंध भागातील दुकाने सुरू होती. मात्र, दुपारनंतर शहराच्या वेगवेगळ्या भागातील दुकाने बंद ठेवण्याचे आदेश स्थानिक पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी दिले.

दुकाने खुली ठेवण्याची मुभा सायंकाळी सातपर्यंत देण्यात आली असली, तरी अनेकांनी सकाळीच खरेदी केली होती. शहरातील मध्य भागातील लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, तुळशीबाग, मंडई भागातील दुकाने बंदच होती. बुधवार पेठेतील इलेक्ट्रिक साहित्य, बोहरी आळीतील लोखंडी साहित्याची (हार्डवेअर)  दुकाने बंदच ठेवण्यात आली होती. नाना पेठ भागातील वाहनांच्या सुट्टय़ा भागांची दुकाने बंद ठेवण्यात आली होती. बुधवार पेठ भागातील चष्मे, उदबत्ती विक्रीची दुकाने सकाळी काही काळ उघडी ठेवण्यात आली होती. दुपारनंतर दुकाने बंद करण्यात आली. या भागातील मोबाइल विक्रीची दुकाने बंदच ठेवण्यात आली होती. अनेक भागातील दुकाने दुपारनंतर बंद झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली.

गॅरेज खुली पण सुटे भागच नाहीत

टाळेबंदीत गेला दीड महिना अनेकांची दुचाकी वाहने बंद आहेत. गुरुवारी शहराच्या अनेक भागातील गॅरेज खुली ठेवण्यात आली. मात्र, ज्या दुचाकींमध्ये काही मोठा बिघाड झाला असेल अशा दुचाकींना लागणाऱ्या सुटय़ा भागांची दुकाने नाना पेठेत आहेत. नाना पेठ भाग प्रतिबंधित क्षेत्रात असल्याने या भागातील दुकाने सध्या बंद आहेत. गॅरेज खुली झाली असली तरी सुटय़ा भागांची दुकाने बंद असल्याने गॅरेजचालकांनी किरकोळ दुरुस्तीची कामे केली. सुटे भाग उपलब्ध झाल्यानंतर दुरुस्तीची कामे मार्गी लावण्यात येतील, असे सांगण्यात आले.

आदेश काय?

महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी प्रतिबंधित क्षेत्र वगळता (करोनाचा संसर्ग असलेला भाग) शहरातील अन्य भागातील दुकाने सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळेत खुली ठेवण्याची मुभा दिली आहे. पोलीस आयुक्त वेंकटेशम यांनीही आदेश स्पष्ट असून सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे.

घडले काय?

प्रत्यक्षात विविध पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी दुपारी दोननंतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दुकानदारांना दिले. दुकाने बंद करा, असे आदेश देत पोलिसांच्या गाडय़ा  शहरात फिरत असल्याचे पाहायला मिळाले.

भवानी पेठेतील भुसार बाजार बंदच

भवानी पेठ, नाना पेठ, गणेश पेठ भागात जुना भुसार बाजार आहे. हा भाग प्रतिबंधित क्षेत्रात येतो. प्रतिबंधित क्षेत्रातील दुकाने १० ते २ या वेळेत खुली ठेवण्याची मुभा आहे. मात्र, या भागातील दुकाने गेल्या काही दिवसांपासून बंद आहेत. या भागात सकाळी फक्त दूध मिळते. किरकोळ किराणा माल विक्रीची दुकाने बंद आहेत. पोलिसांच्या आदेशामुळे भवानी पेठेतील भुसार मालाची दुकाने काही दिवसांपासून बंद आहेत. प्रत्येक वेळी किरकोळ खरेदीदार मार्केट यार्डात जाऊ शकत नाही, अशी तक्रार भवानी पेठेतील भुसार व्यापाऱ्यांनी केली.