पुणे ग्रामीण पोलिसांनी सोमवारी रात्री केलेल्या कारवाईत लोणावळा येथील एका रिसॉर्टवर सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा मारुन तब्बल ७२ जणांना अटक केली आहे. अटकेत असलेल्या ७२ जणांपैकी ६० जणं हे गुजरातमधील व्यापारी आणि उद्योगपती असल्याचं कळतंय. खबऱ्यांकडून माहिती मिळाल्यानंतर मुंबई-पुणे महामार्गावर असलेल्या एका रिसॉर्टवर पुणे ग्रामीण पोलिसांनी सोमवारी रात्री छापा मारला.

लोणावळा डिव्हीजनचे पोलीस अधिकारी नवीन कनवट यांनी इंडियन एक्स्प्रेसला या कारवाई विषयी माहिती दिली. “रिसॉर्टमधील एका मोठ्या हॉलमध्ये जुगार अड्डा सुरु होता. काही जणं पत्ते खेळत होते ज्यासाठी रोख रक्कम आणि जुगारात वापरल्या जाणाऱ्या चिप्सचाही वापर होत होता. आम्ही तब्बल ७२ जणांना अटक केली असून यात ६० पुरुष असून १२ महिला आहेत. अटकेत असलेले काही जणं हे गुजरातमधील व्यापारी आणि उद्योगपती असून त्यांनी रिसॉर्टमध्ये महिला वेटर्सनाही बोलावलं होतं.”

जुगार अड्ड्यात सहभागी झालेल्या ७२ जणांसोबत आम्ही रिसॉर्टचा मालक आणि मॅनेजर यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. सर्व आरोपींवर Maharashtra anti-gambling legislation आणि Epidemic Diseases Act चं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन कारवाई करण्यात आलेली आहे. अटकेत असलेले गुजरातमधील व्यापारी खास या पार्टीसाठी विमानाने आणि खास गाडी करुन लोणावळ्यात आले होते. पोलिसांनी या कारवाईत ३ लाख रुपये रोख रक्कम आणि ४० लाख किमतीच्या गँबलिंग चिप्स असा मुद्देमाल जप्त केला आहे.