चोरटय़ांकडून जप्त केलेला ७८ लाखांचा ऐवज तक्रारदारांना परत
प्रभात रस्त्यावर राहणाऱ्या ८७ वर्षीय मंदाकिनी महादेव दिवेकर यांच्या घरात शिरलेल्या चोरटय़ांनी त्यांचे मंगळसूत्र लांबविले.. हा ऐवज त्यांच्यादृष्टीने लाखमोलाचा होता.. मंगळसूत्र म्हणजे सौभाग्याचे लेणे.. ते परत मिळेल का नाही याची शाश्वती दिवेकर यांना नव्हती.. अखेर पोलिसांनी या गुन्ह्य़ाचा छडा लावून चोरलेले दागिने जप्त केले. न्यायालयीन प्रक्रिया पार पाडल्यानंतर मंदाकिनी दिवेकर यांना त्यांचे मंगळसूत्र पोलिसांनी बुधवारी परत केले.. अन् सौभाग्याचे लेणे परत मिळाल्यानंतर मंदाकिनी दिवेकर यांनी पोलिसांचे मनोमन आभार मानले..
विविध गुन्ह्य़ात चोरटय़ांकडून जप्त केलेले ७८ लाख ३१ हजार ३२७ रुपयांचे दागिने बुधवारी शिवाजीनगर मुख्यालयातील कार्यक्रमात ७३ तक्रारदारांना परत केले. या प्रसंगी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, सहपोलीस आयुक्त सुनील रामानंद, अतिरिक्त आयुक्त सी. एच. वाकडे, शशिकांत शिंदे उपस्थित होते. पोलीस आयुक्तांनी तक्रारदारांना ऐवज सुपूर्द केला. या प्रसंगी मंदाकिनी दिवेकर म्हणाल्या की, माझे पती महादेव हे ९३ वर्षांचे आहेत. घरात चोरी झाल्यानंतर आम्हाला धक्का बसला. पोलिसांनी चोरटय़ांना पकडले. एवढेच नव्हे, तर माझे सौभाग्याचे लेणे परत केले. त्यामुळे त्यांचे आभार शब्दांत मांडता येत नाहीत.
कर्वेनगर परिसरातील प्रज्ञा परांडेकर, तक्रारदार डॉ. विनोद शेलार, स्मिता महामुनी, प्रभाकर थोरात यांनी या वेळी मनोगत व्यक्त केले.
पोलीस आयुक्त शुक्ला म्हणाल्या की, चोरीचा छडा लावणाऱ्या पोलिसांचे काम अभिनंदनास पात्र आहे. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पी. आर. पाटील, पोलीस निरीक्षक सुषमा चव्हाण यांनी तक्रारदारांना ऐवज परत करण्यास मदत केली. सहायक आयुक्त सतीश पाटील यांनी सूत्रसंचालन केले.