गेल्या वर्षी दमदार पावसामुळेही यंदा जलसाठा कमी

पुणे : कालवा गळती, पाणी चोरी, राजकीय हस्तक्षेप अशा विविध कारणांमुळे मागील वर्षी झालेल्या दमदार पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणारी टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला ही चारही धरणे तुडुंब भरली होती. तरीदेखील यंदा जून महिन्याच्या मध्यावर धरणातील पाणीसाठा तीन टीएमसी एवढाच शिल्लक राहिला आहे. दरम्यान, मान्सून सक्रिय होऊनही आतापर्यंत समाधानकारक पाऊस न झाल्याने धरणांच्या पाणीपातळीत वाढ झालेली नाही. तर, जलसंपदा विभागाने १५ जुलैपर्यंतच पाणीपुरवठय़ाचे नियोजन केले आहे. त्यामुळे येत्या पंधरा दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्यास पुणेकरांना पाणीकपातीला सामोरे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

जलसंपदा विभागाच्या शासन निर्णयानुसार कालवा सल्लागार समितीमध्ये प्रत्येक हंगामातील सिंचनाच्या पाणीवापराचे तसेच आवर्तन कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येते. नीरा डावा कालवा ही ब्रिटिशकालीन प्रणाली असून या कालव्याचे बांधकाम होऊन शंभर वर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटला आहे. त्यामुळे या कालव्याच्या भरावातून मोठय़ा प्रमाणात पाणी गळती होत आहे. तसेच या कालव्याच्या लाभक्षेत्राबाहेरील शेतकऱ्यांनी कालव्याचे पाणी अनधिकृतपणे सायपनद्वारे उचलण्याच्या तक्रारी दरवर्षी जलसंपदा विभागाकडे प्राप्त होतात. त्याकरिता जलसंपदा विभागाकडून उपाययोजना करण्यात येतात. परंतु, मनुष्यबळाची कमतरता असल्याचे कारण विभागाकडून दरवर्षी देण्यात येते. मागील वर्षी झालेला दमदार पाऊस आणि परतीच्या पावसामुळे २०१६ पेक्षाही अधिक पाणीसाठा मागील वर्षी धरणांमध्ये झाला होता. पावसाळा संपल्यानंतर २०१६ पेक्षा मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात एक ते सव्वा टीएमसी एवढा पाणीसाठा धरणांमध्ये अधिक होता. परंतु, सद्य:स्थितीत मागील वर्षी एवढाच पाणीसाठा यंदा जून महिन्यात धरणांत शिल्लक राहिला आहे. त्यामुळे अधिक पाऊस पडूनही यंदा काही उपयोग झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

सद्य:स्थितीत जिल्ह्य़ातील पुरंदर, भोर, आंबेगाव, बारामती, खेड, दौंड, जुन्नर, वेल्हा, मुळशी, शिरूर तालुक्यांमधील २१२ वाडय़ा, तीस गावांमधील ५४ हजार ९१० बाधित नागरिकांना एकतीस टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. त्यांपैकी खासगी बावीस आणि शासकीय नऊ टँकर आहेत. भोर आणि बारामती तालुक्यांमध्ये प्रत्येकी चार, पुरंदर दोन, आंबेगाव आणि जुन्नर प्रत्येकी सहा, खेड पाच, दौंड एक, वेल्हा दोन, मुळशी व शिरूर प्रत्येकी एका टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्य़ात सत्तावीस विहिरींचे अधिग्रहण केले आहे.